Friday, 6 June 2025

मोढेरा सूर्य मंदिर | The Sun Temple of Modhera - Part-1

एक अनुपम स्थापत्य चमत्कार


मुंबईहून आम्ही एक सुरेख आणि आठवणीत राहणारा प्रवास केला. राणी की वाव आणि अडालज नी वाव पाहण्याचा विचार होता, पण त्याआधी मोढेरा येथील सूर्य मंदिरात सूर्योदयाच्या वेळचे दृश्य अनुभवायचे ठरवले. त्यामुळे, आम्ही मुंबईहून रात्रीची ट्रेन पकडली आणि सकाळी फार लवकर अहमदाबाद स्टेशनवर उतरलोटॅक्सी आधीच बुक केली होती, त्यामुळे स्टेशनवर पोहोचताच थांबण्याची गरज पडली नाही. लगेचच टॅक्सीमध्ये बसलो आणि सूर्यमंदिराच्या दिशेने रवाना झालो. अहमदाबादहून मोढेरा पर्यंतचे अंतर सुमारे दोन तासांचे आहे. रस्ताही चांगला असून पहाटेची वेळ असल्याने ट्राफिक कमी होता.

आम्ही सूर्यमंदिरात लवकरात लवकर पोहोचायचा प्रयत्न करत होतो, कारण त्या प्राचीन मंदिरावर पडणाऱ्या पहिल्या सूर्यकिरणांचा अनुभव घेणे, हे आमच्या प्रवासाचे मुख्य आकर्षण होते.

सकाळी सातच्या आधीच आम्ही मंदिरात पोहोचलो. प्रवेशद्वारावरून तिकीट घेतले आणि मंदिराच्या परिसरात प्रवेश केला. तेव्हा मंदिराचे वातावरण अत्यंत रम्य आणि शांत होते. नुकतेच पक्ष्यांचे किलबिलाट सुरु झाले होते, हवेत थोडासा गारवा होता आणि आकाश एकदम निरभ्रनिळाशार आणि स्वच्छ! मंदिरात प्रवेश करताच समोर दिसणारी स्थापत्यकलेची भव्यता आणि सूर्यदेवतेसाठी बांधलेले हे अद्वितीय मंदिर पाहून भारावून गेलो.

मंदिराच्या प्रारंगणात स्वच्छतागृहाची उत्तम सोय आहे, त्यामुळे आम्ही आरामात फ्रेश होऊ शकलोहे प्रवासात एक मोठे दिलासादायक ठरते.

हळूहळू पूर्वेकडून प्रकाश वाढत गेला आणि ते जादुई क्षण आलेज्या क्षणी सूर्याची पहिली किरणं मंदिराच्या दिशेने पडायला लागली. तो नजारा इतका अद्भुत होता की क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. त्या क्षणी निसर्ग आणि वास्तुशास्त्र यांचं एक सुंदर मिश्रण अनुभवलं.

मोढेरा सूर्य मंदिर हे भारतातील गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यात मोढेरा या गावी वसलेले आहे. हे मंदिर पश्चिम सोलंकी राजवटीच्या काळात राजा भीमदेव (भीम प्रथम) यांच्या काळात .. १०२६-२७ मध्ये बांधले गेले. हे मंदिर सूर्यदेवाला समर्पित आहे, आणि कोणार्कच्या सूर्य मंदिरासोबत हेही भारतातील प्रसिद्ध सूर्य मंदिर मानले जाते.

स्थापत्यशास्त्राचे अद्वितीय सौंदर्य :

. नियोजन रचना मंदिराची संपूर्ण रचना ही 'सूर्याच्या मार्गानुसार' करण्यात आलेली आहे. संपूर्ण मंदिर तीन प्रमुख भागांत विभागले गेले आहे:

1. सूर्यकुंड (Reservoir / Stepwell)

2. सभामंडप (Assembly Hall / Sabha Mandap)

3. गर्भगृहासह मुख्य मंदिर (Garbha Gruha / Sanctum)

. सूर्यकुंड (सूर्य तलाव)

पाण्याच्या शांतपणात उतरत्या पायऱ्या, जणू सृष्टीच्या एका गूढ ओढीने पृथ्वीच्या गर्भात उतरावं. या तलावाच्या चतु:सीमेला १०८ लहान देवालयं आहेत. पायऱ्यांची रचना इतकी सममित आणि सौंदर्यपूर्ण आहे की, सूर्यप्रकाश त्यावर खेळताना एक दृश्यरम्य जिवंत आकृती निर्माण करतो.

. सभामंडप

स्थापत्यवैशिष्ट्यं:

सभामंडप ५२ कोरीव खांबांवर उभा आहे, जे वर्षातील ५२ आठवड्यांचे प्रतिनिधित्व करतात.

प्रत्येक खांबावर रामायण, महाभारत, पुराणातील प्रसंग आणि देव-देवतांचे जीवनचित्रण केलेले आहे.

खांबांवरील कोरीव काम इतके तपशीलवार आहे की, एका खांबावर नृत्य करणाऱ्या अप्सरा, तिचे अलंकार, तिची मुद्रादेखील स्पष्ट दिसते.

सभामंडप जणू देवतांचा नर्तनगृह आहे. जेथे वायूच्या लहरींवर कोरलेली नारींची मुद्राभंगिमा, देवांच्या चेहऱ्यावरचे भाव, आणि गंधर्वांची वीणा ऐकू यावी अशी भावना निर्माण होते.


. मुख्य मंदिर गर्भगृह

मुख्य मंदिर पूर्वाभिमुख आहे, म्हणजे सूर्योदयाच्या क्षणी सूर्यकिरण थेट गर्भगृहात प्रवेश करतात.

आता गर्भगृह रिकामं आहे, परंतु पूर्वी येथे सूर्यदेवाची सुवर्णमूर्ती विराजमान होती.

गवाक्षातून येणारा प्रकाश काळाच्या गणनेप्रमाणे वेगवेगळ्या वेळेस गर्भगृहात उजळतोहे विज्ञान आणि आध्यात्म यांचे मिश्रण आहे.

   हे दर्शवते की आपल्या पूर्वजांना खगोलशास्त्र आणि भूगोल यांचे प्रगत ज्ञान होते. मंदिराचे स्थापत्य असे आखले आहे की त्याचा उगम बिंदू पूर्वेकडे आहे, जेणेकरून सूर्योदयाचे पहिले किरण हे मूर्तीवर पडतात. मंदिराच्या बाह्य आणि अंतर्गत भागांवर सूर्यनारायणाच्या विविध रूपांची सुंदर मूर्ती आढळतात.

   मंदिराच्या काही भागांत मिथुन शिल्पे म्हणजे प्रेमातील युगुलांची कोरीव मूर्ती कोरलेल्या आहेत. याचा अर्थ केवळ शृंगारिक नसून, मानवी जीवनाचे चक्र पूर्ण करण्याचे प्रतीक मानले जातेधर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या शिल्पांमधील भाव, सौंदर्य आणि नैसर्गिकता अतिशय मोहक आणि वास्तववादी आहे.

मोढेरा सूर्य मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर ते एक कला, विज्ञान, अध्यात्म आणि स्थापत्यशास्त्र यांचे जिवंत उदाहरण आहे. त्या पाषाणांमध्ये जणू काळ थबकून उभा आहे आणि प्रत्येक कोरीव रेषा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतेफक्त आपल्याला ती ऐकण्याची तयारी हवी.

मोढेरा सूर्य मंदिराचा हा अनुभव मंत्रमुग्ध करणारा होता.

ते :३० या वेळेत आम्ही संपूर्ण मंदिर परिसर फिरून काढला. प्रत्येक कोरीव मूर्ती, मंदिराचा नकाशा, जलकुंडाची रचनाहे सारं इतकं बारकाईने कलात्मकतेने घडवलेलं होतं की नजर हटत नव्हती. बरेचसे फोटोही घेतले. पुरातन काळातील ही वास्तुशैली पाहून मन भारावून गेलं. आणि सर्व मनात भरून पूढील प्रवासासाठी सज्ज झालो... पूढील प्रवास राणी की वाव !






No comments:

Post a Comment