सह्याद्रीतील अनेक दुर्ग आजही आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सुधागड… सुधागड ! भोर संस्थानाच्या इतिहासातील महत्त्वाचा आणि वैभवशाली किल्ला. पूर्वी या गडाला ‘भोरप’ असे नाव होते. नंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श या गडाला झाला. महाराजांच्या पावन स्पर्शामुळे या गडाचे नाव पुढे ‘सुधागड’ असे ठेवण्यात आले. तो रायगड जिल्ह्यात असून निसर्ग-सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात तर या किल्ल्यावरून आजूबाजूच्या डोंगररांगा आणि हिरवळ फारच छान दिसते. महाराजांच्या काळात या किल्ल्याला महत्त्व होते. आज सुधागड हा ट्रेकिंग आणि भटकंतीसाठी लोकप्रिय ठिकाण तर आहेच परंतु गडावर भोराई देवीचे मंदिर आहे आणि ग्रामस्थ इथे पूजेसाठी येत असतात.
सुधागडच्या संरक्षणाच्या दृष्टीने पूर्व बुरुज अत्यंत मोक्याचा मानला जातो. भोरप्याची नाळ किंवा घोडजीन वाटेने येणाऱ्या शत्रूला रोखण्यासाठी या बुरुजाची रचना करण्यात आली होती. हा बुरुज जर शत्रूने जिंकला असता, तर त्यांना थेट महादरवाजापर्यंत पोहोचणे सहज सोपे झाले असते. सदर बुरुजाचे संवर्धन होणे हे केवळ गडप्रेमीसाठीच नाही, तर इतिहास जपण्यासाठीही अत्यंत मोलाचे आहे त्यामुळेच ही श्रमदान मोहीम २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी राबवण्यात आली. त्याआधी डिसेंबर २०२४ मध्ये केलेल्या पाहणीत असे लक्षात आले होते की, पूर्व बुरुजाकडे जाणारा सुमारे एक किलोमीटरचा मार्ग पूर्णपणे झाडीने बंद झाला आहे. गवत, काटेरी झुडपे, वेली आणि झावळीमुळे हा मार्ग अत्यंत अवघड व धोकादायक बनला होता.
आमची श्रमदान मोहीम टीम शुक्रवार, २३ जानेवारी २०२६ रोजी डोंबिवलीहून निघाली. शनिवारी भल्या पहाटे ठाकूरवाडी येथे पोहोचल्यानंतर लगेचच ट्रेक सुरू झाला. सुधागडावरील वाड्यावर पोहोचून सर्वजण फ्रेश झाले. चहा-नाश्ता करून सर्वजण मोहिमेसाठी सज्ज झाले. या मोहिमेत गावकऱ्यांनीही मोलाची मदत केली. स्थानिकांच्या साथीत आणि उत्साही सदस्यांच्या एकजुटीने कामाला सुरुवात झाली. पूर्व बुरुजाकडे जाणारी वाट पूर्णपणे झाडीने व्यापलेली होती. अनेक ठिकाणी मार्ग ओळखू येत नव्हता. झाडी-झुडुपे, गवत, काटेरी वेली कापत-कापत, झावळी हटवत आम्ही हळूहळू पुढे सरकत होतो. आम्ही जस-जसे पुढे जात होतो, तस-तसे थकवा कमी आणि जोश वाढत जात होता. प्रत्येक सफाई केलेला भाग आम्हाला पुढे जाण्याची नवी ऊर्जा देत होता.
बुरुजाच्या टॉप व्ह्यू पॉइंटजवळ पोहोचल्यानंतर थोडा ब्रेक घेतला. समोर पसरलेला निसर्ग, स्वच्छ झालेली वाट आणि केलेल्या कष्टांचे समाधान मनाला अत्यंत आनंद देत होते. थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा शेवटचा टप्पा पूर्ण केला आणि अखेर पूर्व बुरुजापर्यंत सुरक्षित वाट मोकळी झाली. त्या क्षणी सर्वांनी मोकळा श्वास घेतला व चेहरे आनंदाने उजळले. ‘ट्रेकक्षितिज संस्था, डोंबिवली’च्या या श्रमदान मोहिमेमुळे आज पूर्व बुरुज पुन्हा एकदा गडप्रेमी आणि पर्यटकांसाठी सुरक्षित व खुला झाला आहे.
ही मोहीम म्हणजे केवळ वाट साफ करण्याचे काम नसून आपल्या इतिहासाशी जोडलेली जबाबदारी निभावण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे. सुधागड आणि त्यावरील पूर्व बुरुज पुढील अनेक वर्षे असेच इतिहासाची साक्ष देत उभे राहावेत, हीच अपेक्षा.
---



.jpeg)
.jpeg)
.jpeg)