Friday, 6 June 2025

अडालज बावड़ी | अडालज नी वाव | Adalaj Stepwell - Part 3 Final

मोढेरा सूर्य मंदिर व राणी की वाव प्रवास करून पुढे.... 

    आमचा प्रवास सुरेखपणे सुरूच होता. सकाळीच मोढेराचं सूर्यमंदिर पाहायला गेलो. प्राचीन भारतीय स्थापत्यशास्त्राचं ते एक अप्रतिम उदाहरण आहे. त्यानंतर ‘राणी की वाव’ हे ठिकाण देखील झाले. राणी की  वाव पूर्णपणे पाहून झाल्यावर आम्ही साधारण १ वाजता तिथून निघालो. त्यानंतर, आमचा पुढचा टप्पा होता – ‘अडालज नी वाव’.  साधारण २ तासांचा प्रवास होता, पण वेळ अगदी सहज गेला. जेवणासाठी थांबलो. तासा भराचं जेवण आणि थोडं फ्रेश होऊन साधारण ४ वाजेपर्यंत आम्ही अडालज येथे पोहोचलो. तिकिटं काढून आत प्रवेश केला. आत गेल्यावर, वावेत उतरता उतरता पुन्हा एकदा त्या अद्भुत भारतीय स्थापत्यकलेचा अनुभव घेतला. अडालज वाव हे केवळ पाण्याचा स्रोत नव्हतं, तर एक सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र होतं, हे तिथलं संपूर्ण वातावरण जाणवून देत होतं.

 


    भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) अडालज वाव हे राष्ट्रीय वारसा स्मारक म्हणून संरक्षित ठेवले आहे. स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमूना अडालज वाव ही हिंदू आणि इस्लामी स्थापत्यशैलीचा सुरेख संगम आहे. जाळीदार खिडक्या, कमानी, खांब, आणि गवाक्ष यांचे अप्रतिम एकत्रीकरण आढळते. या वावेत वापरलेले काळ्या आणि लाल दगडाचे मिश्रण त्याच्या सौंदर्यात भर घालते.

    १५व्या शतकात (सुमारे .. १४९९) राणी रुदाबाईने या बावडीचे बांधकाम सुरू केले. रुदाबाई ही तत्कालीन राजा वीरसिंहच्या मृत्यूनंतर सती जाणार होती, पण मुस्लिम सरदार मोहम्मद बेगडा याने तिला अडवले आणि तिला ही बावडी पूर्ण करण्याची संधी दिली. बावडी पूर्ण झाल्यावर राणीने मात्र सती जाणेच पसंत केले. ही प्रेम, बलिदान आणि स्थापत्य कौशल्याची गोष्ट आजही या वावमधून जिवंत वाटते.

 

वैशिष्ट्यपूर्ण रचना 

- पाच मजली खोल वाव
- भूमिगत मंदिरासारखी गडद आणि थंड जागा
- ठिकठिकाणी कोरलेली हिंदू इस्लामिक शैलीतील नक्षीकाम
- शिल्पांमध्ये हत्ती, पुष्पदले, देवी-देवतांची सुंदर चित्रं
- सूर्यप्रकाश थेट तळात पोहोचत नाही, त्यामुळे दिवसाही अंधार आणि थंडी जाणवते

 


    अडालज बावडी म्हणजे इतिहास, प्रेम, स्थापत्य आणि संस्कृती यांचं अद्वितीय दर्शन. तुम्ही गुजरातच्या प्रवासात असाल, तर ही वाव नक्कीच बघाहे केवळ एक स्थळ नाही, तर एक अनुभव आहे.

    मोढेरा सूर्य मंदिर, राणी की वाव आणि अडालज बावड़ी / (अडालज नी वाव) या तिन्ही स्थळांनी आमच्या मनावर अमीट छाप उमटवली. प्रवास संपत आला तरी, त्या वावांतील शिल्पकलेचा प्रभाव मनात खोलवर राहिला. आणि आम्ही परतीच्या प्रवासासाठी अहमदाबाद साठी निघालो. 

    नीट प्लॅन  केला तर केवळ दोन दिवसांत मोढेरा सूर्य मंदिर - राणी की वाव आणि अडालज की वाव ही तिन्ही ठिकाणे पाहून होतात. 

 


No comments:

Post a Comment