आम्ही बर्याच दिवसांपासून मनात ठेऊन ठेवलेली देवघळीची ट्रिप अखेर ठरवलीच. रत्नागिरीचा दोन दिवसांचा प्लॅन ठरला, आणि चर्चेअंती तिकीटंही बुक झाली. वाट पाहिलेली संधी मिळाली होती – आता समुद्राचा गाज निवांत ऐकत वेळ घालवायचा होता, नुसते येऊन निघायचे नव्हते.
आम्ही सकाळी लवकर निघालो, आणि रत्नागिरीला पोहचल्यावर तिथेच आमची पीकअपसाठी गाडी आली होती. थोडं फ्रेश झालो आणि पुढे निघालो देवघळीच्या दिशेने – जिथे एक शांत, साधीशी पण मनाला भिडणारी छोटी जागा आहे. तिथे एक दादा आणि वाहिनी, राहायची आणि जेवायची सोय करून देतात. त्यांच्या जागेची आत्मीयता जाणवतो – घरगुती जेवण आणि अगदी जवळ टाकलेले टेंट्स – सगळंच अगदी आपल्यासारखं वाटणारं.
दिवस कलायला लागला तसं सूर्यास्ताच्या साक्षीने आम्ही समुद्रकिनारी बसलो. त्या क्षणी समुद्राच्या लाटा, मऊ वाळू आणि आकाशातले रंग यांचं एक सुंदर संमेलन झालं होतं. सूर्य जसा हळूहळू क्षितिजाच्या मागे जात होता, तसं तिथलं प्रत्येक क्षण अंगावर रोमांच आणणारा होता.
रात्री टेंटमध्ये झोपताना दूरवरून येणारा समुद्राचा गाज, आणि थोडं दूरवरच्या नारळांच्या झाडांचा सळसळणारा आवाज – यांची संगत काहीशी स्वप्नवत वाटली. रात्रीचं आभाळसुद्धा इथे वेगळंच भासतं – अंधाराचा कुशीत विसावलेलं, पण चांदण्यांनी झगमगलेलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी समुद्रकिनारी फेरफटका, मग घरगुती नाष्टा आणि निवांत वेळ – मोबाईल, गोंगाट, घाई यापासून दूर.
हे दोन दिवस कसे निघून गेले, समजलंही नाही. आणि मग, वेळ झाला तो परतीचा – जड अंत:करणाने, पण सुंदर आठवणी घेऊन आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. देवघळी आमच्या आठवणीत घर करून गेलं. तो गाज, तो सूर्यास्त, ती शांतता – हे सगळं कायमचं मनात कोरलं गेलं.




No comments:
Post a Comment