जानेवारी 2025 मध्ये आम्ही डेजर्ट नॅशनल पार्कचा (Desert National Park -DNP) एक संस्मरणीय प्रवास
केला. थंडीच्या दिवसांमध्ये राजस्थानच्या उघड्या वाळवंटी प्रदेशात संध्याकाळी थोडासा
गारवा होता. आमचे मुख्य उद्दिष्ट होते — “माळढोक
पाहणे”,
म्हणजेच जगप्रसिद्ध ग्रेट इंडियन बस्टर्ड,
हा अतिदुर्मीळ आणि संकटग्रस्त पक्षी पाहण्याचा प्रयत्न.
तिच्या संरक्षणासाठी Desert National Park अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते.
Desert National Park, ज्याला आपण वाळवंटी राष्ट्रीय उद्यान म्हणतो, हे राजस्थान राज्यात जैसलमेर आणि बारमेर या जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. जवळजवळ ३१६२ चौरस किमी क्षेत्रफळात विस्तारित हे उद्यान भारतातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे इथले वाळवंटी भूगोल, मोठमोठे सेंड ड्युन्स, शांत, विशाल आणि खुला परिसर व त्यामध्येही भरभरून दिसणारा जैवविविधतेचा खजिना. थार वाळवंटाचे अथांग सुवर्ण वाळूचे ढिगारे, सतत बदलणाऱ्या टेकड्या, मोकळे वातावरण आणि येथील दुर्मिळ वन्यजीव जग — हे सर्व मिळून हा प्रदेश एक अद्भुत अनुभव देतो.
माळढोक हा पक्षी अत्यंत दुर्मीळ आणि संकटात सापडलेल्या प्रजातींपैकी एक आहे. त्याचे लांबट शरीर, उंच मान, आणि पांढऱ्या-तपकिरी रंगाचे पंख हे त्याचे सौंदर्य खुलवतात. त्याला पाहणे म्हणजे नशिबाची गोष्टच!
आम्ही मुंबईहून रात्रीची ट्रेन पकडून भल्या पहाटे जोधपुरला उतरलो. तेथून आमचा प्रवास सुरू झाला. रस्त्यात मस्त एका ठिकाणी चहा नास्ता करून पूढील प्रवासाला लागलो आणि पोहोचलो एका टेंट सिटि मध्ये. खरे सांगायचे झाले तर, सुरुवातीचे काही तास थोडे अवघड गेले. पाण्याची टंचाई, आवश्यक गोष्टी ऑन-डिमांड, आणि उघड्या वाळवंटी परिसरातील तप्त सूर्य. पण संध्याकाळी थंडगार वाऱ्याची झुळूक आणि शांत वातावरणाने सारा थकवा घालवला.
Desert National Park मध्ये माळढोक व्यतिरिक्त देखील विविध पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे वास्तव्य आहे. हे उद्यान फक्त पर्यटनाचं केंद्र नसून निसर्गसंवर्धनाचं अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे. या शिवाय
DNP म्हणजे फक्त रेतच नाही; येथील पारिस्थितिक तंत्र, वनस्पती, प्राणी, पक्षी, जीवाश्मं (fossils) — हे सगळं एकत्र अनोखी निसर्गरचना आहेत.
प्राण्यांमध्ये तुम्हाला इथे चिंकारा, ब्लॅकबक, डेजर्ट फॉक्स, लांडगा / डेजर्ट कॅट/ खोकड व इतर प्राणी दिसू शकतात. त्याशिवाय, विविध प्रकारचे गरुड, शिकारी पक्षी आणि गिधाडे सुद्धा चांगल्या प्रकारे दिसतात. अल्पशा तापमानात येणारे स्थलांतरित पक्षी इथे पाहायला मिळतात. वनस्पतींचा परिसर जरी विरळ असला तरी खुरट्या वनस्पती, गवत माळरान तर दिसतेच शिवाय, हे पार्क भूगर्भीयदृष्ट्यादेखील महत्त्वाचे आहे — सुमारे 180 दशलक्ष वर्षे जुनी जीवाश्मं (fossils of plants and animals) इथे सापडली आहेत. वाळवंटातील विविध साप व सरपटणारे प्राणी आणि मोहक सूर्यास्त, यामुळे ही सफर रोमांच, शांतता निसर्गाचा नवीन अनुभव देते.
कुठून आणि कसे जायचे?
डेजर्ट नॅशनल पार्कचा प्रवेश सामान्यतः जैसलमेर मार्गे होतो.
सर्वात सोयीचा मार्ग: मुंबईहुन येणार असाल तर
मुंबई → जोधपूर (by Train)
→ जैसलमेर (by Road) → Desert National Park
जवळचे रेल्वे स्टेशन: जोधपूर
जवळचे विमानतळ: जोधपूर / जैसलमेर
अंतर: जोधपूर ते जैसलमेर अंदाजे 263 किमी (5 तास प्रवास)
आम्ही 2 रात्र त्या ठिकाणी होतो. तिसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासात थोडाच वेळ देऊन जैसलमरचा किल्ला पहिला कारण वेळ कमी होता. जैसलमेरच्या सोनार किल्ल्यावरून परतीचा प्रवास सुरू करताना मनात एक विचार ठसठसत राहिला – आपण जे निसर्ग पाहतोय, त्याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. Desert National Park आणि माळढोकने आम्हाला निसर्गाच्या सौंदर्याची आणि संवर्धनाच्या गरजेची जाणीव करून दिली.
डेजर्ट नॅशनल पार्क हे फक्त वाळूचे ढिगारे नसून - जीवन, शांतता आणि रोमांच यांचा संगम आहे. किमान एकदा तरी या सुवर्ण वाळवंटात पाऊल ठेवणे हा जीवनातील अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो.
