Tuesday, 10 June 2025

पाणखोल जुवा बेट – एक निसर्गरम्य जगत, सिंधुदुर्ग | PANKHOL JUVA, SINDHUDURG |


सिंधुदुर्ग जिल्हा हा आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी, समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि ऐतिहासिक किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात एक छोटं पण अत्यंत आश्चर्यकारक देखणं बेट आहे - पाणखोल जुवा बेट, एक वेगळे, निसर्गरम्य आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण. हे बेट अगदीच छोटं असून, साधारण ३० ते ३५ घरं इथे आहेत. पण या बेटाची खासियत म्हणजे इथल्या लोकांनी आपलं पारंपरिक आणि निसर्गसंपन्न जीवनशैली जपली आहे.

 घराबाहेर गाडी नाहीतर बोट आहे!

शहरात जसं प्रत्येकाच्या दारात एक गाडी दिसते, तसं या बेटावर प्रत्येकाच्या दारात एक छोटी बोट दिसते. पाण्यातून प्रवास करणं हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. ही बोटच त्यांची ओळख, त्यांचं वाहन आणि त्यांच्या जीवनाचं अविभाज्य अंग बनली आहे. सरकारने इतर संस्थांनी या बेटावर पूल बांधण्याचा प्रस्ताव मांडला होता, पण गावकऱ्यांनी ठाम नकार दिला. त्यांना बाहेरच्या दुनियेचा गोंगाट नको आहे. त्यांना हवा आहे तो शांत निसर्ग, स्वच्छता, आणि पारंपरिक आयुष्य. पूल बांधला गेला असता, बाहेरील वर्दळ वाढली असती आणि बेटाचा निसर्ग बिघडला असताहे ते चांगलं जाणून आहेत.

बेटावर शांतता, हिरवळ, माडाची झाडं, मासेमारीचं पारंपरिक ज्ञान, आणि सागरी खाद्यसंस्कृती पाहायला मिळते. जळाच्या कुशीत वसलेलं हे बेट म्हणजे निसर्गाशी एकरूप झालेलं जीवन. येथे समुद्र, मॅंग्रोव्ह (खारफुटी जंगल) आणि जैवविविधतेचा सुंदर संगम पाहायला मिळतो. खारफुटीच्या जंगलामुळे किनारी परिसंस्थेचे संरक्षण होते.

जुवा बेट हे नुसतंच एक पर्यटनस्थळ नाही, तर सांस्कृतिक आणि पर्यावरणीय भान असलेल्या लोकांचं उदाहरण आहे. इथे एक दिवस घालवणं म्हणजे आपल्या धावपळीच्या आयुष्यात एक गोड विराम घेणं होय, जिथं निसर्ग, माणूस आणि शांतता यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो.

पाणखोल जुवा बेट हे सिंधुदुर्गातील एक निसर्गसंपन्न रत्न आहे. समुद्र, खारफुटी, पक्षीजीवन आणि शांत वातावरण यांचा संगम अनुभवायचा असेल तर हे बेट नक्कीच भेट द्यावे. हे ठिकाण केवळ पर्यटनासाठीच नव्हे तर निसर्गसंवर्धनासाठी देखील महत्त्वाचे आहे.

 

No comments:

Post a Comment