Monday, 9 June 2025

आंबोली निसर्ग आणि वन्य जगत प्रवास : एक निसर्गरम्य अनुभव | AMBOLI WILDLIFE |

    आंबोली हे सह्याद्री पर्वतरांगांतील एक रम्य आणि समृद्ध ठिकाण, जिथे निसर्गाचे खरे सौंदर्य अनुभवायला मिळते. विशेषतः जून ते सप्टेंबर या पावसाळी महिन्यांत आंबोलीचा परिसर जीवसृष्टीने भारलेला असतो. धुकट हवामान, सततचा पाऊस, हिरवाईने व्यापलेले डोंगर, आणि जागोजागी कोसळणारे धबधबे – हे दृश्य मन मोहून टाकते. आंबोलीचे सौंदर्य पावसाळ्यात अगदी अवर्णनीय होते. जसे आपण एखाद्या साहित्यिक पुस्तकात वाचतो. धुक्याच्या आच्छादनामुळे सगळं परिसर गूढतेने भरून जातो. रस्त्यावर एखादी टिमटिमती गाडीची लाईट दिसली, की क्षणभर वाटतं की आपण एखाद्या चित्रपटाच्या सेटवर आहोत. आंबोलीच्या धबधब्यांचे आवाजही दूरवरून ऐकू येतात – पाण्याचा तो सातत्याने खाली कोसळणारा आवाज मनात एक वेगळी शांतता निर्माण करतो.

    हे सर्व अनुभवण्यासाठीच की काय, मुंबईच्या गडद संध्याकाळीत आम्ही आमचा प्रवास सुरू केला. संध्याकाळची ट्रेन पकडून दुसऱ्या दिवशी सकाळी वाजता आम्ही घटप्रभा स्टेशनवर उतरलो. पिकअपसाठी गाडी वेळेवर पोहोचलीच होती. थकवा होता, पण प्रवासाची उत्सुकता जास्त होती. थोड्याच वेळात नाश्त्यासाठी थांबलो. गरमागरम इडली-वडा आणि मस्त फिल्टर कॉफी - प्रवासाला सुरुवात करण्यासाठी उत्तम संगती! नाश्ता झाल्यावर आम्ही निघालो गोकाकच्या दिशेने.

    गोकाकला पोहोचलो तेव्हा समोर उभं होतं एक सुंदर देऊळ, आणि त्यामागे धबधब्याचं गर्जन करतं सौंदर्य. निसर्ग आणि अध्यात्माचं असं सुंदर मिलन फारच भारावून टाकणारं होतं. यानंतर आम्ही गोडचिनामलकी धबधबा तथा मार्कंडेय धबधबा पाहायला गेलो. मार्कंडेय नदीवरचा धबधबा म्हणजे निसर्गाची अप्रतिम कलाकृती! थांबावंसं वाटावं असं हे ठिकाण होतं

    ही सर्व ठिकाणं पाहून आम्ही बेळगावकडे मार्गस्थ झालो ते ही वेळेचं गणित सांभाळत. पुढे बेळगावात एका खानावळीत केळीच्या पानावर गरमागरम जेवण घेतलंजणू काही थेट मातीतल्या चवीनं भरलेलं. त्यानंतर आम्ही आंबोलीकडे रवाना झालो. बेळगाव ते आंबोलीचा प्रवास हा एक रमणीय अनुभव होता. मध्येच लागलेला नांगरतास धबधबा आणि आंबोली धबधबा यामुळे प्रवास अधिकच सुखद झाला.

    थोड्या उशिरा आम्ही आमच्या रिसॉर्टमध्ये पोहोचलो. फ्रेश होऊन गरमागरम चहा आणि बाहेर पाऊस, धुके आणि निसर्गाचं मंत्रमुग्ध करणं सौंदर्य याचा अनुभव घेत शांत झालोआंबोलीचं स्वागतच वेगळं होतं. मस्त फ्रेश झालो आणि गप्पा टप्पा करीत वेळ घालवला आणि रात्रीचे जेवण उरकून वाट पहात होतो पूढील उपक्रमाची.

    रात्रीची उत्कंठा वाढवत आम्ही निघालो वन्यजीव रात्रीच्या सफारीसाठी. पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) येथे दिसणाऱ्या साप, बेडूक, सरडे, पाली . यांसारख्या प्रजाती पाहताना निसर्गाची जैवविविधता प्रत्यक्ष अनुभवता आली. हे प्राणी त्यांच्या रंगीबेरंगी रूपामुळे निसर्गप्रेमींना आकर्षित करतात. बेडकांच्या अनेक प्रजाती इथे आढळतात, विशेषतः मलबार ग्लायडिंग फ्रॉग हा तर तेथील प्रदेशनिष्ठ असा सुंदर हिरवा बेडूक आहे जो पाहणे सुखदायक आहे. त्यांचे रंग, आवाज आणि हलचाली पाहणे म्हणजे एक विस्मयकारक अनुभव आहे. सापांच्या प्रजातींमध्ये व्हाईपर, ट्रिंकेट स्नेक, व्हाइन स्नेक इत्यादीचा समावेश आहे. सरडे विंचू, आणि पालींच्या विविध प्रजाती येथे सहज दिसतात. त्यांचं रंगसंगती आणि निसर्गाशी समरसून गेलेलं अस्तित्व पाहून निसर्गाचं अद्भुत गणित जाणवतं. उभयचर आणि सरपटणारे प्राणी इतक्या जवळून पाहणं म्हणजे वेगळाच अनुभव होता. रिसॉर्ट मध्ये येऊन मस्त विश्रांती घेतली.

     दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून गरमागरम चहा घेतला. आणि सकाळच्या वन्यजीव ट्रेलमध्ये धुक्याने भरलेल्या वातावरणात चालत साप आणि सरपटणाऱ्या प्रजाती पाहिल्या. चालता चालता निरीक्षण करत जाणंनिसर्गाशी एकरूप होणं हे अनुभवायला मिळालं. रिटर्न येऊन आंबोळी आणि चटणी खाऊन, लगेच आवरून आम्ही निघालो बाबा धबधब्याकडे. उंच कड्यावरून कोसळणारं पाणी, आणि आजूबाजूचा शांत परिसरपाहत राहावं असं दृश्य


    उशिरा माघारी येऊन जेवण करून थोडासा ब्रेक घेऊन निघालो हिरण्यकेशी मंदिराकडे आणि तेथे हिरण्यकेशी नदीचं उगमस्थान पाहिलं. देवराईतील हे शांत मंदिर आणि निथळ पाण्याची अनुभूती ही मनाला शांती देणारी होती. आणि नेहमीप्रमाणे सर्व आवरून आता रात्री दुसऱ्या वन्यजीव ट्रेलसाठी सज्ज झालो. चालत जाण्याची थोडी भीती होती, पण जी प्रजाती पाहायला मिळाल्या त्याने ती सारी भीती विसरायला लावली. सफारीनंतर मस्त झोप लागली.

    आता तिसरा दिवस. निवांत उठून चहा-नाश्ता घेतला. मोठ्या मुश्किलने अवरते घेतले आणि सगळे आवरुन चेक आउट करायची वेळ आली. ऑन द वे कावळेसाद पॉइंट पाहायला गेलो. धुकं, भुरभुर पाऊस आणि खाली दरीतले नजारे – आंबोलीची खरी ओळख. बऱ्याच वेळ तिथे घालवला.

 शेवटी सर्व आठवणी मनात साठवत, आम्ही सावंतवाडी स्टेशनवरून मुंबईकडे परतीच्या प्रवासाला निघालो. एकंदरीत आंबोलीचा प्रवास म्हणजे फक्त पर्यटन नाही, तर निसर्गाच्या आणि वन्य जीवनाच्या गाभ्यात डोकावण्याचा एक अविस्मरणीय अनुभव आहे. इथली जैवविविधता, पावसाळ्यातलं निसर्गसौंदर्य, आणि वन्य प्राण्यांचं सहज दर्शन यामुळे आंबोली निसर्गप्रेमींसाठी, छायाचित्रकारांसाठी आणि संशोधकांसाठी एक पर्वणी ठरतं.

    जर तुम्ही निसर्गाची खरी अनुभूती घ्यायची असेल, तर आंबोलीच्या पावसात भिजा – इथला ओलसर, थोडासा धुंद आणि पूर्णतः निसर्गमय अनुभव आयुष्यभर लक्षात राहील. हा एक असा प्रवास होता – जिथे निसर्ग, शांतता आणि वन्यजीव यांचा संगम अनुभवता आला. २ रात्री ३ दिवस असा हा प्लान करता येतो. आंबोली परिसरात छोटे होमस्टे आणि रिसॉर्ट आहेत, जिथे तुमची राहायची आणि जेवायची व्यवस्था होऊ शकते. आजूबाजूला असलेला परिसर आणि पॉइंट पाहायला गाडी मात्र लागते. त्याच सोबत वन्य जीव पहायचे असतील तर मात्र तज्ञ हा सोबत असावाच लागतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला माहिती आणि सुरक्षा मिळते. सावंतवाडी रेल्वे स्टेशन ते आंबोलीचे अंतर अंदाजे ३० KM आहे. तुम्ही या मार्गाने देखील आंबोली मध्ये येऊ शकता. बेळगाव ते आंबोली हा रास्ता अत्यंत निसर्गरम्य असल्याने आम्ही तो मार्ग घेऊन अजूनबाजूची ठिकाणे पहात येथे दाखल झालो.




No comments:

Post a Comment