Monday, 9 June 2025

कोकणातील कातळशिल्पे : प्राचीन गूढाचा संगम व कोकणातील वारसा | Petroglyphs | Geoglyphs

 

    महाराष्ट्रातील कोकण प्रदेश हा केवळ समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्यामुळेच नव्हे, तर त्याच्या समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भूगर्भीय वारशामुळेही प्रसिद्ध आहे. माणसाच्या आदिम जीवनाची साक्ष देणारे कातळशिल्प (Petroglyphs) हे आपल्या महाराष्ट्रातील आणि विशेषतः कोकणातील एक अप्रतिम सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभव आहे. ही कलेची प्राचीन रूपे जणू काळाच्या वाळवंटात उगवलेली एक पुरातत्त्वीय हिरवळच आहेत. हजारो वर्षांपूर्वी आदिमानवांनी आपल्या भावना, श्रद्धा, अनुभव आणि निसर्गाशी असलेले नाते कातळांवर कोरून ठेवले — तीच ही कातळशिल्पं.

कातळशिल्प म्हणजे काय?

    कातळशिल्प (Petroglyphs) म्हणजे कठीण दगडांवर कोरलेली, खाचलेली किंवा चिरलेली चित्रे. ही चित्रे हजारो वर्षांपूर्वी आदिमानवांनी तयार केली आहेत. ती शिकारी, नृत्य, प्राण्यांचे दर्शन, धार्मिक श्रद्धा इ. विविध विषयांवर आधारित आहेत. साधारणत: ४ फुट पर्यन्त आकार असलेल्यांना Petroglyphs आणि त्यापेक्षा जास्त आकार असलेल्यांना Geoglyphs असे संबोधले गेले आहेत.


    कोकणातील जमिनीची रचना ही लॅटराईट आणि मुख्यतः जांभा दगडांवर आधारित आहे. हे जांभा दगड कोरडे, टिकाऊ आणि खोदण्यास सोपे असल्यामुळे, कदाचित आदिमानवांना यावर कातळशिल्पे कोरणे सोपे गेले. कोकणातील अनेक पठारे, उदा. राजापूर, रत्नागिरी, देवगड या ठिकाणी असे कातळशिल्पे आढळतात, जी उघड्यावर कोरलेली आहेत. कोकणातील ही कातळशिल्पे घनदाट जंगलं, ओहळ, डोंगराळ रचना आणि जलप्रवाहांजवळ सापडतात. त्यामुळे त्या ठिकाणी गेल्यावर एक प्रकारचे गूढ वातावरण निर्माण होते. ही शिल्पे फक्त चित्रे नाहीत, तर त्या काळातील माणसाचा निसर्गाशी असलेला सुसंवाद दाखवतात. कला, इतिहास आणि मानवजातीचा विकास या तिन्हीचा संगम कातळशिल्पांमध्ये पाहायला मिळतो. कातळांवर कोरलेली ही चित्रे म्हणजे केवळ रेखाचित्र नव्हे, तर त्या काळातील मानवी जीवनशैली, श्रद्धा, निसर्गसाक्षात्कार आणि संस्कृतीचे दस्तऐवज आहेत. यातून आदिमानवाचे निसर्ग निरीक्षण तसेच त्याची जीवनशैली उलगडते.

    दक्षिण महाराष्ट्रातील कशेळी, रूंध्ये तळी, देवाचे गोठाणे, बारसू (बर्सू), देवी हसोल, जंभारूण, उक्षी आणि कुडोपी तसेच गोव्यातील सांगे-पणसायमळ येथे सापडलेली भूचित्रे (Geoglyphs) ही आपल्या सांस्कृतिक वारशाची मौल्यवान साक्ष आहेत. या भूचित्रांमध्ये सापडणाऱ्या ६०० हून अधिक आकृती विविध प्राणी, मानवसदृश आकृती, प्रतीकात्मक चिन्हे व निसर्गाशी संबंधित रचना यांचे अप्रतिम दर्शन घडवतात. त्यांची मांडणी समूहांमध्ये केलेली असून त्या अत्यंत सुबक, जतन झालेल्या आणि कलात्मक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत.

कातळशिल्पांचा प्रकार आणि वैशिष्ट्ये

• प्राणी, मानवाकृती, शिकारीचे प्रसंग, इत्यादींची रेखाटने आढळतात. 

• काही ठिकाणी जलचर प्राणी किंवा अगदी महासागराशी संबंधित प्रतीके देखील दिसतात.

    ही कातळशिल्पे कोणत्याही एकाच धर्माची किंवा संस्कृतीची नसून, सर्वसामान्य मानव अनुभवाचे आणि त्याच्या विचारसरणीचे दर्शन घडवतात.अलीकडच्या काळात सरकार आणि स्थानिक पुरातत्त्व संस्थांनी या कातळशिल्पांच्या शोधासाठी जतनासाठी विशेष मोहिमा राबवल्या आहेत.

    कोकणातील कातळशिल्पे म्हणजे केवळ प्राचीन इतिहासाची खूण नाही, तर ही एक गूढ आणि अजूनही न उलगडलेली रहस्ये असलेली संस्कृतीची साक्ष आहे. "परशुरामाची भूमि" ही केवळ पौराणिक नाही, तर ती मानवाच्या आद्यकाळातील कलेची आणि निसर्गाशी असलेल्या संबंधांची साक्ष आहे.

    कातळशिल्प ही केवळ एक कला नाही, तर ती मानवजातीच्या उत्क्रांतीतील एक महत्त्वाची खूण आहे. महाराष्ट्र आणि कोकणाची ही अमूल्य सांस्कृतिक ठेव भविष्यातील अभ्यासकांसाठी एक ऐतिहासिक खजिनाच आहे. तिचं संवर्धन, जतन, आणि जागरूकतेसाठी लोकसहभाग अत्यंत गरजेचा आहे. भारतातील काही जुनी कातळशिल्पं सुमारे १०,००० वर्षांपूर्वीची, म्हणजे मेसोलिथिक कालखंडातील आहेत. ही कातळशिल्पे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


4 comments: