Friday, 4 July 2025

DANDELI WILDLIFE | दांडेली वन्यजीव अभयारण्य

 


    दांडेली हे कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यात वसलेले एक समृद्ध जैवविविधतेने भरलेले जंगल आहे. हे क्षेत्र दांडेली-अंशी टायगर रिजर्वचा एक भाग आहे, ज्याला आता काली टायगर रिजर्व म्हणूनही ओळखले जाते. हे अभयारण्य काली नदीच्या किनाऱ्यावर वसले असून विविध प्रकारचे पशुपक्षी, सरपटणारे प्राणी आणि वनस्पतींनी समृद्ध आहे.

    आम्ही जानेवारी महिन्यात दांडेलीला भेट दिली. थंडीचा हंगाम असल्यामुळे हे जंगल भटकायला, जंगल सफारी करायला आणि पक्षी निरीक्षणासाठी एकदम योग्य होते. आमचे टार्गेट खूप सारे पक्षी बघणे आणि थंडीचा आस्वाद घेणे होते. आम्ही मुंबईहून ट्रेन ने प्रवास करून लोंढा येथे उतरलो, व येथून गाडीने आम्ही गुंड गावापर्यन्त गेलो, जिथे आमची राहायची सोय होती. रस्त्यात डोंगररांगा, हिरवीगार झाडी आणि अधूनमधून दिसणारे लहान गावं – या सगळ्यांमुळे प्रवास सुखद झाला.

 

थंडीमुळे सकाळी सकाळी आजूबाजूला धुके पसरलेलं असायचं. शांत गारवा आणि पक्ष्यांच्या मंजुळ आवाजांनी भरलेली सकाळअगदी स्वर्गीय वाटायचं. आम्ही गणेशगुडी परिसरात पक्षी निरीक्षण केलं, जे दांडेलीतील एक प्रसिद्ध हॉटस्पॉट आहे. इथे आम्हाला  बऱ्याच पक्षांचे दर्शन झालं. टिंबर ठिकाणी तर हॉर्नबिल्स (धनेश पक्षी) विपुल प्रमाणात दिसले. झाडांना फळे धरली होती त्यामुळे असंख्य धनेश त्यावर तुटून पडले होते. येथे इंडियन जायंट स्क्विरल सुद्धा यथेच्छ ताव मारताना दिसल्या.


दांडेलीचं जंगल म्हणजे भरपूर पर्जन्यवृष्टी मिळणारं सदाहरित जंगल. काली नदीचं पात्र हे इथल्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालणारं प्रमुख वैशिष्ट्य आहे. नदीवर कोळ्यांच्या होड्यांनी सफर, कयाकिंग, वॉटर राफ्टिंगसारखे साहसी उपक्रमही करता येतातजंगलामध्ये फिरताना वाघ, बिबटे, साळिंदर, रानडुक्कर, काळवीट असे प्राणी पाहायला मिळतात, पण यासाठी नशिब लागते. आम्ही जंगल सफारी केली पण मोठे प्राणी फारसे दिसले नाहीत; रानमांजर, साळिंदर पहाटेच्या वेळेला प्रवास करताना मात्र दिसले. जंगलाचा गूढपणा आणि शांतता अनुभवली व तो अनुभव जबरदस्त होता.

ह्या साऱ्या अनुभवांनी दांडेली आमच्या मनात कोरलं गेलं. नैसर्गिक सौंदर्य, पक्ष्यांचा कलरफुल जलवा आणि जंगलाची गूढ शांतताहे सगळं आम्ही पुन्हा अनुभवायचं ठरवलं आहे!

 

 

अगुंबे रेन फॉरेस्ट – एक जिवंत गूढतेचा अनुभव | AGUMBE RAINFOREST | कलिंगा सेंटर फॉर रेनफॉरेस्ट इकोलॉजी (KCRE) | Kalinga Rainforest Ecology Center Aumbe KCRE | कालिंगा माने Kaalinga Mane |

KARNATAKA UNPLANNED प्रवास सुरूच होता .... 

    जेवल्या नंतर आमचा पूढील प्रवास होता अगुंबे रेन फॉरेस्ट मधील कालिंगा मानेच्या दिशेने. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दाट जंगलं, धुकं, आणि अधूनमधून येणारा सरींचा शिडकावा – अगुंबेने आपलं जादूचं राज्य उघडलं होतं!

    अगुंबे, कर्नाटक राज्यातील शिवमोगा/शिमोगा/ शिवमोग्गा जिल्ह्यातील एक लहानसे गाव, हे पश्चिम घाटांमध्ये वसलेले असून, भारताच्या सर्वाधिक पावसाळी भागांपैकी एक मानले जाते. याला दक्षिणेचे "चेरापुंजी" देखील म्हणतात. अगुंबेचे जंगल म्हणजे एक समृद्ध, दाट आणि नितांतसुंदर रेन फॉरेस्ट, ज्यात निसर्गाच्या अनेक रूपांची आणि रहस्यांची एकत्रित अनुभूती होते. अगुंबे परिसरात दरवर्षी ७,००० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडतो. मानसून सुरू होताच संपूर्ण जंगल धुंद पावसात न्हालं जातं, झाडांवरून सतत पाणी झरत असतं, आणि संपूर्ण परिसर एकदम ओलसर, थंड आणि धुकेभरलेला होतो. सततचा पाऊस आणि धुके यामुळे इथलं वातावरण कायमच गूढ आणि संमोहक वाटतं.

    हे जंगल विविध प्रकारच्या उंच-सखल झाडांनी आणि वेलींनी गच्च भरलेलं आहे. तिथं हिरवळ एवढी घनदाट आहे की सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचतोच असं नाही. त्यामुळे दिवसाही थोडं अंधारलेलं वातावरण असतं. अगुंबे रेन फॉरेस्ट हे जैवविविधतेचं खजिनं आहे – सर्पराज 'किंग कोब्रा', विविध रंगांचे बेडूक, दुर्मिळ पक्षी, वन्य प्राणी आणि असंख्य औषधी वनस्पती इथे आढळतात. पावसाळ्याच्या काळात अगुंबे परिसरात इतकं धुके पसरलेलं असतं की काही वेळा दोन मीटर पुढेही स्पष्ट दिसत नाही. हे धुके, त्याच्यावर उमटणारा सूर्यप्रकाश, झाडांवरून पडणाऱ्या पाण्याच्या थेंबांचा आवाज – या सर्व गोष्टींनी अगुंबेचं वातावरण अधिकच रहस्यमय आणि मंत्रमुग्ध करणारं वाटतं. अगुंबे रेन फॉरेस्ट हे फक्त जंगल नाही, तर ते एक अनुभव आहे – निसर्ग, गूढता, शांतता आणि समृद्धतेचं सुंदर मिश्रण. हे ठिकाण आपल्या मनात एक गहिरं, थरारक आणि समाधानी भाव जागवतं, जणू काही निसर्गाने स्वतःची गोष्ट आपल्याला कुजबुजून सांगितली आहे.

    आणि इथेच आहे कलिंगा सेंटर फॉर रेनफॉरेस्ट इकोलॉजी (KCRE) ही एक पर्यावरणीय शिक्षण संस्था. KCRE हे कर्नाटक राज्यातील शिवमोग्गा जिल्ह्यातील तीर्थहल्ली तालुक्यातील अगुंबे होबळी येथे वसलेले आहे. येथे व्यावसायिक किंवा शैक्षणिक पार्श्वभूमी काहीही असलेल्या लोकांना, वैज्ञानिक उपकरणे शिकण्यासाठी कार्यशाळा व शिबिरांच्या माध्यमातून मार्गदर्शन दिले जाते. २०१२ पासून, KCRE पर्यावरण शिक्षणासाठी एक प्रवेशद्वार म्हणून कार्यरत आहे. KCRE मध्ये वन्यजीव प्रेमीछायाचित्रकार व निसर्गप्रेमींना निवास आणि खानपानाची सुविधाही उपलब्ध आहे. या केंद्रात नामांकित संस्थांमधील विद्यार्थी व संशोधकांसाठी इंटर्नशिपची संधीही दिली जाते.

ही संस्था डॉ. पी. गौरी शंकर, वन्यजीव शास्त्रज्ञ आणि सर्पतज्ज्ञ यांनी त्यांच्या पत्नी शर्मिला आणि इतर टीम चालवतात त्यांनी सापांबद्दल जनजागृती करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.  

२००५ मध्ये एका रेस्क्यू दरम्यान पी. गौरी शंकर यांना किंग कोब्राच्या विषाच्या परिणामाचं जीवंत अनुभव आला, ज्यामुळे "हे जगतभर एकच प्रजाति नाही का?" या प्रश्नावर संशोधनाची प्रेरणा मिळाली. त्यांचे संशोधन जर्नल ‘European Journal of Taxonomy’ मध्ये प्रकाशित झाले आणि त्यांनी सिद्ध केले की किंग कोब्रा एकच नसून चार स्वतंत्र प्रजातींचा समूह आहे. 

डॉ. गौरी शंकर हे जवळपास २० वर्षांचा अनुभव असलेले वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी "किंग कोब्रा"च्या फाय्लोजिओग्राफीवरील संशोधनासाठी पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांचे संशोधन उत्क्रांतीविषयक जीवशास्त्रात आधारित आहे, विशेषतः आग्नेय आशियामध्ये किंग कोब्रा सापांचा भौगोलिक प्रसार आणि जनुकीय विविधतेवर त्यांचा अभ्यास केंद्रित आहे. त्यांनी किंग कोब्रा सापांवर आधारित ११ शास्त्रीय संशोधन निबंधांत योगदान दिले असून इतर सरपटणाऱ्या प्रजातींवर १० पेक्षा अधिक लेख प्रकाशित केले आहेत. TED फेलो (२०२०) आणि TEDx वक्ते म्हणून, ते शिक्षणाच्या माध्यमातून संवर्धनासाठी प्रयत्न करतात आणि जनजागृती वाढवण्यासाठी विशेष कार्यशाळा विकसित केल्या आहेत. 

या कालावधीत त्यांनी ४०० हून अधिक साप वाचवले व सुरक्षित स्थळी हलवले असून ५० हून अधिक अंड्यांची घरटी जवळून निरीक्षण केली आहेत. त्यांच्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे सापांचे संरक्षण करणे, त्यांचे स्थलांतर सुलभ करणे, सापांवरील वैज्ञानिक संशोधनाला चालना देणे आणि माणसांमध्ये व सापांमध्ये होणाऱ्या संघर्षाचे निराकरण करण्यासाठी नाविन्यपूर्ण कार्यक्रम विकसित करणे होय.    

त्यांच्या योगदानाची दखल घेत, स्वीडिश हर्पेटोलॉजिकल सोसायटीने त्यांना २०१५ मध्ये "हर्पेटोलॉजिस्ट ऑफ द इयर" या पुरस्काराने सन्मानित केले.

    आम्ही फार भाग्यवान होतो की नेमके पी. गौरी शंकर सर तिथे उपस्थित होते कारण ते इतके व्यस्त असतात की भेट होईल की नाही शंका होती. आणि त्यांना भेटून आनंद झाला. त्यांनी आम्हाला फारच प्रेमाने आणि आपुलकीने विचारणा केली आणि गप्पा मारल्या. बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. सर एकदम आनंदी, आकर्षक व मोहून टाकणारी अशी व्यक्ति आहे. आम्ही तिथे दोन नेचर ट्रेल केले. त्या दिवशी पाऊस खूपच जोरदार होता त्यामुळे जे मिळेल ते पाहून आम्ही परतलो. त्या जंगलात एवढ्या जळू आहेत की जवळपास १०० एक तरी आमच्या अंगावर असतील. भीतीच वाटून गेली. या सेंटर पर्यन्त पोहोचण्याचा आणि नेचर ट्रेल करायचा अनुभव नक्कीच घेण्या सारखा आहे. 

    केसीआरई (KCRE) चे ऑपरेशन्स मॅनेजर श्री. प्रशांत यांचे मनःपूर्वक आभार – त्यांचे नेहमी हसतमुख असणे, मदतीचा हात पुढे करणे आणि आमच्या जंगल ट्रेलचा अनुभव अत्यंत सुंदररीत्या आयोजित केल्याबद्दल विशेष धन्यवाद. तसेच, संपूर्ण सत्रभर आमच्यासोबत प्रामाणिकपणे आणि उत्साहाने साथ दिल्याबद्दल श्री. संकेत यांचेही मनापासून आभार.    


आमचा हा प्रवास काही दिवसांचा नव्हता, पण निसर्गाची एकदम जवळून ओळख करून देणारा होता. ना कोणती योजना, ना कोणती गडबड – फक्त निसर्ग आणि आम्ही.