Sunday, 8 June 2025

माळरान सफारी, पुणे - सोलापूर | कडबनवाडी | शिरसुफळ | बोरामणी | GRASSLAND SAFARI, PUNE-SOLAPUR | KADBANWADI | SHIRSUPHAL | BORAMANI


महाराष्ट्रातील गवत प्रदेश (Grasslands) हे भारतातील सर्वात कमी चर्चिले गेलेले, परंतु पर्यावरणीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे नैसर्गिक अधिवास आहेत. दख्खन पठारावर पसरलेले हे अर्ध-शुष्क प्रदेश वर्षातील बहुतांश काळ कोरडे असतात आणि पावसाळा आल्यावरच नव्या जीवनाने खुलून येतात. पहिल्या नजरेत उघडे–निर्जन वाटणारे हे प्रदेश प्रत्यक्षात अत्यंत संपन्न जैवविविधतेने नटलेले आहेत आणि येथे आढळणाऱ्या प्रजाती या विशेषतः या वातावरणाशी जुळवून घेतलेल्या आहेत. माळरान म्हणजे असे विस्तीर्ण, सपाट किंवा थोडे उंचवट्याचे भूभाग जे पावसाळ्याशिवाय इतर ऋतूंमध्ये कोरडे, बऱ्याचदा वृक्षविरहित व गवताळ स्वरूपाचे असतात. या प्रदेशात मानवनिर्मित शेती कमी असते, पण जैवविविधतेचा खजिना मात्र दडलेला असतो.

भिगवण परिसरात पाणथळ भागाबरोबरच गवत-माळरानावरही सफारी आयोजित केल्या जातात. सोलापूर इंदापूर मधील या माळरान सफारी ठिकाणांमध्ये  शिरसुफळ (शिर्सुफळ), कडबनवाडी आणि बोरामणी ही तीन प्रमुख ठिकाणं आहेत. माळरान हे एक कोरडे, काटेरी वनस्पतींनी भरलेले अधिवास असून, येथे वेगळ्या प्रकारचे पक्षी प्राणी आढळतात.

उघडा माळरानासारखा विस्तार, अमर्याद क्षितिज, पक्षीनिरीक्षणासाठी उत्तम वातावरण, आणि सकाळच्या पहाटे किंवा संधिप्रकाशात फोटोग्राफीसाठी आदर्श अशी परिस्थिती - यामुळे हा प्रदेश फोटोग्राफर मंडळींना वेगळा अनुभव देतो. येथे दाट जंगल नसल्यामुळे मिळणाराओपन लॅंडस्केप सफारीचा अनुभव अनोखा आणि शांतता भरलेला असतो.

माळरानातील पक्षी:

  • शिकारी पक्षी: शिक्रा, इम्पीरियल गरुड, पॅलिड हॅरियर, शॉर्ट-टूड साप गरुड, ईगल, शृंगी घुबड, पिंगळा, स्टेप्पे गरुड, शिक्रा, मोंटुगास हॅरियर, बोनेलीचा गरुड, लाल डोक्याचा ससाणा आणि बरेच काही हे आकाशात भिरभिरताना सहज दिसतात.
  • गवत झुडुपातील पक्षी: खाटीक, राखी कावळा, भोरड्या, काळा ससाणा, हुदहुद, लालसरी, खंड्या, भारद्वाज, बुलबुल, मुनिया, इंडियन कोर्सर, चेस्टनट-बेलीड सँडग्राउस, सायबेरियन स्टोनचॅट, बुश चॅट, सिंगिंग बुश लार्क, इंडियन बुश लार्क, क्रेस्टेड लार्क, ग्रे फ्रँकोलिन, इत्यादि अशा स्थानिक स्थलांतरित पक्ष्यांचे ही दर्शन होते.
  • माळरानवरील वाघ म्हणून ज्याला संबोधले जाते तो म्हणजे कोल्हा. इथे त्याची झुंड देखील पाहावयास मिळते. त्या व्यतिरिक्त चिंकारा (भारतीय गझेल), ससा, तरस, खोकड सफारीवेळी दर्शन देतात.


भिगवण पक्षी निरीक्षण प्लान करताना कुंभारगाव या ठिकाणी होमस्टे आहेत तिथे तुम्हास राहायची आणि जेवणाची सोय करता येते. शिवाय तेथे तुम्ही माळरान सफारी देखील करू शकता. वेळेचे गणित नीट मांडले तर पक्षी निरीक्षण आणि माळरान सफारी या दोन्ही गोष्टी एकाच भेटीत करता येतात.



माळरान सफारी प्लान

सफारी क्षेत्र स्थान:

1.   शिरसुफळ (शिर्सुफळ)

गाडीखेल गेट शिरसुफळ साबळेवाडी पारवडी

एकूण अंतर: सुमारे ४० किमी

2.   कडबनवाडी

3.   बोरामणी


कडबनवाडी माळरान सफारी – वन्य प्रदेशातील एक नव्या प्रकारचा अनुभव!

तुम्हाला वाटत असेल की सफारी म्हणजे फक्त दाट जंगलं आणि वाघांचा प्रदेश. पण कडबनवाडी गवताळ प्रदेश तुम्हाला एक अगदी वेगळा आणि रोमांचक अनुभव देतोय. मोकळ्या, सुवर्णसर गवताळ मैदानांमध्ये, जिथे निसर्ग हलक्या वाऱ्याच्या आवाजात आणि पक्ष्यांच्या सुरेल गाण्यांतून संवाद साधतो.

पुणे जिल्ह्यातील इंदापूरजवळ असलेले कडबनवाडी हे विशाल गवताळ प्रदेश आणि समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जाते. पहिल्या नजरेत हे कोरडे लँडस्केप साधे वाटू शकते, पण याच ठिकाणी भारतीय कोल्हा, मुंगूस, चिंकारा तसेच हारियर, लार्क्स आणि नशिब जोरावर असेल तर दुर्मिळ ग्रेट इंडियन बस्टर्डसारखे अनेक विलक्षण जीव आढळतात!

आणि सगळ्यात उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे — जुलै 2025 पासून कडबनवाडीने स्वतःची जिप्सी सफारी सुरू केली आहे!


तुम्ही हा लपलेला खजिना अगदी टायगर रिझर्व्हसारखाच एक्सप्लोर करू शकता. असीम निळे आकाश, दूरवर पसरलेले क्षितिज आणि अलगद वाहणारी हवा — हे सगळं मिळून अत्यंत ताजेतवाने करणारा अनुभव देते. फोटोग्राफी, पक्षीनिरीक्षण किंवा शांत, ग्रामीण वन्यसौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर हे ठिकाण परफेक्ट!

सफारीदरम्यान तुम्ही लयबद्ध उतार–चढाव असलेल्या गवताळ पट्ट्यांतून, तसेच पक्षी सहज पाहता येतील अशा सुंदर पॉइंट्समधून प्रवास करता. पहाटेची वेळ आणि संध्याकाळची वेळ तर अगदी जादुई — सोनेरी प्रकाश, शांतता आणि निसर्गसौंदर्य यांचा संगम शहराच्या गोंगाटापासून खूप दूर असल्याचा भास निर्माण करतो. महाराष्ट्रातील दुर्लक्षित पण अतिशय सुंदर नैसर्गिक संपत्तींपैकी एक अनुभव तुम्हाला इथे नक्की मिळेल.

सफारी वेळा:

  • सकाळी: ०६:३० ते १०:३०
  • संध्याकाळी: ०३:०० ते ०६:३०

बुकिंग माहिती:

  • अधिकृत संकेतस्थळ: grasslandsafari.org
  • या वेबसाइटवरून तुम्ही:
    • सफारी बुक करू शकता
    • स्वतःचं वाहन रजिस्टर करू शकता

सफारी पद्धत:

  • बुकिंग केल्यानंतर गेटवर पोहोचल्यावर प्रवेश दिला जातो
  • प्रवेशानंतर तुमच्या स्वत:च्या वाहनातून सफारी करता येते
  • एक प्रशिक्षित गाईड तुमच्यासोबत असतो, जो मार्गदर्शन करतो आणि माहिती देतो

एकदा तरी या समृद्ध अश्या माळरानावर भेट देणे सुखावह नक्कीच ठरेल. 

No comments:

Post a Comment