Tuesday, 10 June 2025

मायरेस्टिका दलदल – एक जैववैविध्यपूर्ण नैसर्गिक खजिना | Myristica Swamp - The Primitive Swamp Forests Of The Western Ghats

मायरेस्टिका दलदल (Myristica Swamp)-एक जैववैविध्यपूर्ण नैसर्गिक खजिना  :

आम्ही नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा परिसरात पक्षी निरीक्षणासाठी गेलो होतो. तिथे स्थानिक मार्गदर्शकांशी बोलताना "मायरेस्टिका दलदल" याबद्दल ऐकायला मिळालं. त्याबद्दल ऐकूनच इतकी उत्सुकता निर्माण झाली की आम्ही लगेच तिकडे निघालो!

मायरिस्टिका स्वॅम्प्स (Myristica Swamp) ही भारतातील अतिदुर्मिळ प्राचीन परिसंस्था आहे ती झाडांनी आच्छादलेली ओलसर जमीन असून प्रामुख्याने वेस्टर्न घाट्समधील सदाहरित जंगलांच्या आतल्या छोट्या खाचखळग्यात आढळते. असा हा गोड्या पाण्याचा, दलदलीचा दाट हिरव्या जंगलाने झाकलेला अधिवास. अंधाऱ्या, गूढ वातावरणातील हे बुंध्यांचे वृक्ष सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत उंचच उंच वाढत जातात. बारमाही वाहणाऱ्या पाण्यात टिकून राहाण्यासाठी त्यांच्या बुंध्यातूनच असंख्य मुळांचे पाय फुटतात तिरके वाढून जमिनीत घुसतात आणि झाडाला आधार देतात. सतत पाण्याखाली असणाऱ्या इथल्या जमिनीतील ऑक्सिजनच्या अभावामुळे मुळांमध्ये घडून आलेलं हे अनुकूलन. झाडांची मुळे जमिनीच्या बाहेर दिसणारी असतात (pneumatophores), जे दलदलीत श्वास घेण्यासाठी उपयोगी असतात. भारतातील पश्चिम घाटात, विशेषतः कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यात मायरिस्टिका स्वॅम्प्स आढळतात. याशिवाय, अंदमान आणि निकोबार बेटांमध्येही यांचा एक छोटासा भाग अस्तित्वात आहे


  • या जंगलांना Primitive (आद्य) स्वॅम्प फॉरेस्ट्स म्हटले जाते, कारण या प्रकारची जंगले प्राचीन भूवैज्ञानिक काळापासून अस्तित्वात आहेत.
  • हे दलदलयुक्त जंगल संपूर्ण वर्षभर पाण्याखाली असते.
  • दलदलीचे स्वरूप असल्याने पावसाचे पाणी साठवून ठेवतात भूजलपातळी कायम ठेवतात.
  • या सदाहरित झाडांमुळे मोठ्या प्रमाणावर कार्बन शोषला जातो.
  • स्थानिक सूक्ष्म हवामान नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
  • येथे अनेक दुर्मिळ कीटक, उभयचर, जलचर, सरपटणारे प्राणी, आणि विशेष प्रकारचे पक्षी आढळतात.
  • पक्षी निरीक्षकांसाठी ही जागा म्हणजे एक स्वर्गच!

तिथे गेल्यावर झाडांची घनदाट रचना, गडद सावली, पाण्याखालची जमीन, आणि पक्ष्यांचा मंजुळ आवाजहे सगळं अनुभवलं. या अनोख्या जंगल रचनेनं मन भारावून गेलं. आपण किती नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध आहोत याचा खरंच अभिमान वाटतो.

त्यामुळे मायरिस्टिका स्वॅम्प्स ही केवळ ओलसर दलदल नसून ती जैवविविधतेची खाण, पाणलोट क्षेत्रांचे रक्षण करणारी परिसंस्था आणि प्राचीन निसर्गाचा एक जिवंत वारसा आहे.

धोक्ये :

  • अतिक्रमण शेतीसाठी जमीन वापर
  • जंगलतोड
  • हवामान बदलामुळे वाढलेला दुष्काळ किंवा पूर
  • स्थानिक पातळीवर जागरूकतेचा अभाव

 

अभ्यास संरक्षण :

  • भारतातील पर्यावरणशास्त्रज्ञांनी या Myristica Swamps वर सखोल संशोधन केले असून, यांचे Western Ghats Biosphere Reserve मध्ये मोठे महत्व मानले जाते.
  • या दलदलीचे संरक्षण झाल्यास वेस्टर्न घाटातील परिसंस्थेला अधिक बळ मिळेल.
  • पर्यावरण शिक्षण, स्थानिक सहभाग, आणि पर्यावरणपर पर्यटन यामुळे यांचे जतन शक्य आहे.

 

अशी ठिकाणं ही भविष्यासाठी संरक्षित ठेवणं अत्यावश्यक आहे.

---


No comments:

Post a Comment