Monday, 9 June 2025

नळसरोवरचा प्रवास व पक्षीनिरीक्षणाचा एक अविस्मरणीय अनुभव | NAL SAROVAR

    निसर्गप्रेमींसाठी नळसरोवर हे एक अद्वितीय आणि सुंदर ठिकाण आहे. गुजरात राज्यात अहमदाबादपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर वसलेलं हे सरोवर, पक्षीनिरीक्षकांचं स्वर्ग आहे. मला नुकताच नळसरोवरचा अनुभव घेण्याची संधी मिळाली आणि तो प्रवास आजही माझ्या मनात ताजाच आहे.

सरोवर व पाणथळ भूमी (रामसर दर्जा)

    नळसरोवर हे एक विस्तीर्ण पाणथळ क्षेत्र असून त्यास रामसर दर्जा प्राप्त आहे. अंदाजे १२० स्क्वे. किमी क्षेत्रफळ असलेलं हे सरोवर, सुमारे ३६५ हून अधिक प्रकारच्या पक्ष्यांचं निवासस्थान आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात सरोवराकडे पोहोचल्यावर समोर दिसणारे निसर्गदृश्य, पाण्यावर हलकीशी धुंद धुके, आणि पक्ष्यांचा मंजुळ किलबिलाट – हे सर्व एकत्रितपणे मनाला शांती देणारं दृश्य होतं. सरोवरात छोटी बोट घेऊन आम्ही पाण्यावर तरंगत होतो. बोटीच्या दोन्ही बाजूंनी विविध रंगांचे आणि आकारांचे पक्षी पाहायला मिळाले –बगळे, काळे पाणकावळे, सुरेख चकचकीत रंगाचे बदकं, आणि पांढरे सुरम्य क्रेन्स  आणि बरेच... काही पक्षी पाण्यात माशांची शिकार करत होते, तर काही झुडपांवर विसावत होते.

    स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन हा नळसरोवरचा खास भाग आहे. दरवर्षी शेकडो स्थलांतरित पक्षी रशिया, सायबेरिया, युरोप अशा थंड भागांतून हिवाळ्यात येथे येतात. त्यांची अचूकता, थव्यांमधील समन्वय, आणि गती पाहून थक्क व्हायला होतं.

    सरोवराजवळच स्थानिक लोक बोटींची व्यवस्था करतात. त्यांच्या तोंडून या भागातील पक्ष्यांविषयी आणि हवामानातील बदलांबद्दल ऐकणं, हे ही एक वेगळं शैक्षणिक अनुभव होतं. त्याच बरोबर या सरोवराच्या आसपास देखील अत्यंत समृद्ध अशी ठिकाणे आहेत जिथे अनुकूल असे अधिवास तयार झालेले आहेत आणि विविध प्रकारचे तिथे पक्षी दिसतात.

शेवटी...

    नळसरोवर हा केवळ पक्ष्यांसाठी नव्हे, तर आपल्या मनासाठीही एक शांततादायक ठिकाण आहे. निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ घालवणं आणि विविध पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहणं – यामुळे आपल्यात एक नवचैतन्य निर्माण होतं.

    नळसरोवरचा हा अनुभव निसर्गप्रेमी, छायाचित्रकार, आणि पक्षीनिरीक्षक सगळ्यांसाठीच अत्यंत संस्मरणीय आहे.

 



No comments:

Post a Comment