Sunday, 8 June 2025

भिगवण पाणथळ पक्षीनिरीक्षण | BHIGAWAN BIRDING

    महाराष्ट्र ही निसर्गवैविध्याने समृद्ध आणि विविध अधिवासांनी नटलेली भूमी आहे. या राज्यात डोंगराळ भाग, घनदाट जंगलं, समुद्रकिनारे, पठारं आणि पाणथळ प्रदेश अशी विविधता पाहायला मिळते. या विविधतेमुळेच महाराष्ट्र वन्यजीव पक्षीनिरीक्षणासाठी एक आदर्श गंतव्य ठरते. 

    याच पार्श्वभूमीवर, पुणे-सोलापूर महामार्गावर पुण्यापासून सुमारे १०० कि.मी. अंतरावर असलेले भिगवण हे उजनी धरणाच्या बॅकवॉटरवर वसलेले एक सुंदर, समृद्ध आणि जैवविविधतेने नटलेले पाणथळ क्षेत्र आहे.

भिगवणमहाराष्ट्राचे 'मिनी भरतपूर'

    भिगवण हे स्थान महाराष्ट्राच्या पाणथळ क्षेत्रांमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. उजनी धरण भीमा नदीवर बांधले गेले असून, यामुळे निर्माण झालेली उथळ पाणथळ जागा अनेक स्थलांतरित स्थानिक पक्ष्यांसाठी आदर्श अधिवास बनली आहे. येथे सुमारे ३०० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झाली आहे. म्हणूनच भिगवणलामहाराष्ट्राचे मिनी भरतपूरअसे म्हणणे वावगे ठरणार नाही. हिवाळ्याच्या कालखंडात, विशेषतः नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान, येथे फ्लेमिंगो, ग्रे हेरॉन, पेंटेड स्टॉर्क, वूल्ली नेक्ड स्टॉर्क, कॉमन क्रेन, विविध डक्स, टर्न्स, वॅगटेल्स, पेरिग्रीन फाल्कन, बार हेडेड गुज, मार्श हॅरियर, स्पून बिल्ड, वेस्टर्न ऑसप्रे (कैकर), प्राटीनकोल इत्यादि सारख्या अनेक स्थानिक, स्थलांतरित आणि दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन होते. येथील दलदली क्षेत्रात छोटे छोटे पक्षी तुरूतुरू धावताना सहज दिसतात. यामुळे भिगवण पक्षीप्रेमींसाठी एक स्वर्गच ठरतेथंडीच्या दिवसांत पळस मैना इथे मोठ्या प्रमाणात येतात आणि आकाशात त्यांचे थवे इतके सुंदर दृश्य तयार करतात की त्यात गुंग व्हावे. 

    भिगवण हे ठिकाण फक्त पक्षीनिरीक्षणापुरते मर्यादित नसून तेथील आसपास असलेला प्रदेश पाणथळ + माळरान अशा दुहेरी अधिवासामुळे येथे विविध प्रकारच्या वन्यजीवांचा अभ्यास करता येतो. या ठिकाणी जपणूकपूर्वक संवेदनशीलतेने पर्यटन करणे गरजेचे आहे. वन्यजीवाचा सन्मान ठेवत, स्थानिक मार्गदर्शकांसह निरीक्षण करत भिगवणचा अनुभव घेणे हा निसर्गप्रेमींसाठी एक अविस्मरणीय ठरतो.

    भिगवण पक्षी निरीक्षण प्लान करताना कुंभारगाव या ठिकाणी होमस्टे आहेत तिथे तुम्हास राहायची आणि जेवणाची सोय करता येते. शिवाय तेथे बोट सफारी देखील आहेत. स्थानिक लोक आपणास बोट सफारी घडवून आणतात. त्यांना आता बऱ्यापैकी पक्ष्यांचे ज्ञान आहे. त्यांना त्यांची नावे, सवयी आणि काही गंमतीदार गोष्टी माहीत आहेत आणि आपल्या सोबत ते शेअर करतात. 
    भिगवण पक्षी निरीक्षण प्लान करताना तुम्ही माळरान सफारी देखील करू शकता त्याची माहिती पूढील ब्लॉग मध्ये पाहू शकता. 


No comments:

Post a Comment