सह्याद्रीतील मंदिरे व लेणी :
महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि अध्यात्माचा अविभाज्य भाग म्हणजे सह्याद्री पर्वतरांग. सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्राच्या पाठीवरचा सजलेला मुकुट आहे. इथे असलेल्या नद्यांचे उगम, हिरवळ, दऱ्या, धबधबे हे निसर्गाचे वरदान आहेत. पण या पर्वतरांगेतले खरे रत्न म्हणजे येथे वसलेली मंदिरे व लेणी. ही केवळ भक्तीची केंद्रे नाहीत, तर इतिहास, शिल्पकला, आणि संस्कृतीची संगमस्थळं आहेत. ही केवळ एक भौगोलिक रांग नाही तर श्रद्धेचा कणा, संत परंपरेचा साक्षीदार, आणि प्राचीन भारतातील वैभवशाली जीवनशैलीचा दावेदार आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेली मंदिरे आणि कोरलेली लेणी ही फक्त स्थापत्यकलेची उदाहरणं नाहीत, तर ती आपल्याला त्या काळातील धार्मिक श्रद्धा, सामाजिक व्यवस्था, आणि सांस्कृतिक एकतेची जाणीव करून देतात.
महाराष्ट्राचा इतिहास खूपच प्राचीन आहे. वैदिक काळात देखील या भूमीचा उल्लेख आढळतो. इथे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांसारख्या थोर संतांनी भक्तीचा आणि समतेचा संदेश दिला. त्यांच्या अभंग आणि ओव्या आजही लोकांच्या ओठांवर आहेत. हे संत केवळ धर्ममार्गदर्शक नव्हते, तर सामाजिक सुधारणांचे प्रणेते होते. त्यांच्या विचारांनी एक वेगळीच सांस्कृतिक एकता निर्माण केली. संत तुकारामांनी भक्ती म्हणजे अंतःकरणाची पूजा मानली, तर संत ज्ञानेश्वरांनी मंदिर म्हणजे जीवनाच्या तत्वज्ञानाचे प्रतीक मानले. त्यांच्यासाठी मंदिर म्हणजे आत्म्याचा दीप, जिथे ज्ञानाचे ज्योती प्रज्वलित होते. त्यांना वाटे की, मंदिर ही एक गुरुकिल्ली आहे –जिथून बाहेर पडताना मन अधिक विशाल, अधिक शांत होते.
लेण्यांचा इतिहास आणि व्यापार मार्ग
भीमाशंकर, हरिश्चंद्रगड, राजमाची, कर्जत परिसरातील कोंढाणे लेणी आणि अजिंठा-एलोरा यांसारख्या लेण्यांचा इतिहास हजारो वर्षे मागे जातो. या लेण्या बौद्ध, जैन आणि हिंदू परंपरेचे अद्वितीय उदाहरण आहेत. या ठिकाणी व्यापाऱ्यांनी, साधूंनी आणि प्रवाशांनी विश्रांती घेतली, ध्यान केले, आणि आपले जीवन यथार्थ केले. लेण्यांच्या ठिकाणी असलेली जलवाहिन्यांची आणि निवास व्यवस्था पाहिली, तर त्या काळातील योजनाबद्धता आणि स्थापत्यशास्त्र किती विकसित होते, याची साक्ष पटते.
मंदिरे : भक्तीची आणि एकतेची केंद्रे
सह्याद्रीत असलेल्या मंदिरांची विविधता आणि त्या मागची श्रद्धा पाहिली तर हे लक्षात येते की इथे धर्म, जात, आणि वर्ग यांच्यापलीकडे जाऊन लोक एकत्र येतात. बालेश्वर, कणकादेवी, कोल्हापूरची महालक्ष्मी, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, आणि सज्जनगड यांसारख्या ठिकाणी आजही हजारो भाविक एकत्र येतात. ही मंदिरे फक्त धार्मिक ठिकाणं नाहीत, तर इथून समाजशिक्षण, पर्यावरणसंवर्धन, आणि एकात्मतेचा प्रसार होतो.
सह्याद्री – देवभूमीतील पायघड्या, विविध समाज, एक श्रद्धा
महाराष्ट्रात विविध जातीधर्मांचे लोक राहतात, पण या सर्वांना एकत्र बांधून ठेवणारी गोष्ट म्हणजे त्यांची श्रद्धा. या श्रद्धेचं केंद्र सह्याद्रीतील ही मंदिरे आणि लेणी आहेत. भक्तिभाव हा इथल्या जनतेच्या जीवनाचा भाग आहे – गडावर चढून दर्शन घेणं, वारीला जाणं, लेण्यात ध्यान करणं, हे सर्व अनुभव एकात्मतेचे दर्शन घडवतात.
सह्याद्रीतील मंदिरे व लेणी ही केवळ प्रेक्षणीय स्थळं नाहीत. ती आपल्या संस्कृतीचा आत्मा आहेत. महाराष्ट्राचं प्राचीन साहित्य, संतांची शिकवण, आणि लोकांच्या मनात खोलवर रुजलेली श्रद्धा यांचं मूर्त रूप म्हणजे ही स्थळं. या स्थळांनी इतिहास साठवला आहे, आणि आजही ते नवीन पिढ्यांना प्रेरणा देत आहेत. हीच खरी आपल्या संस्कृतीची ताकद आहे.
सह्याद्रीच्या कुशीत विसावलेली मंदिरे म्हणजे जणू काळाच्या अंगणात उभी असलेली भक्तीची शिल्पकविता. डोंगर-दऱ्यांतून पावसाच्या सरी झेलत, सूर्यकिरणांच्या सोनसळी आळवात न्हात, ही मंदिरे फक्त देवाच्या स्थाने नाहीत, ती संतांच्या, वीरांच्या, आणि सामान्य जनतेच्या मनांची समाधीस्थाने आहेत.
काव्यात्मक मंदिराचे चित्रण
सकाळच्या पहाटे, सह्याद्रीच्या डोंगरातून उगम पावणारे सोनेरी किरण जेव्हा मंदिराच्या कलशावर पडतात, तेव्हा मंदिर साक्षात तेजस्वी देवतेसारखे भासते. सभोवताली शांतता असते, फक्त पक्ष्यांचे कलकलाट आणि ओंजळीत घेतलेली सूर्योदयाची आरती. संध्याकाळी, सूर्य जेव्हा पश्चिम दिशेला झुकतो, तेव्हा मंदिराच्या गाभाऱ्यात वाजणारी घंटा, धूपाच्या वासाने दरवळलेले वातावरण, आणि शेजारी काठावर वाहणारी मंद वाऱ्याची झुळूक – हे सगळं एक सोहळा वाटतो. भक्तांचे डोळे मिटतात, मन गुंतते, आणि हृदय पुन्हा परम शक्तिच्या स्पंदनात लिन होते.
मंदिरांची वास्तुशैली – इतिहासाची साक्ष
या सह्याद्रीच्या मंदिरांमध्ये नागर शैलीच्या मंदिरांची नितांतसुंदर उदाहरणं आहेत – शिखरे, सुरेख कोरीव काम, आणि खांबांवरची पौराणिक कथा सांगणारी शिल्पे. नागर शैलीतील मंदिरांचे स्थापत्य जणू काळाच्या दगडांवर कोरलेली संस्कृती आहे. भूमिज शैलीत मात्र स्थिरता आणि गंभीरतेचा संगम दिसतो. पंचायतन शैलीतील मंदिरे म्हणजे मध्यवर्ती मुख्य देवतेभोवती चार उपदेवतांची रचना – एक धर्मवृक्षाच्या फांद्यांसारखी भक्तीची रचना आणि हेमाडपंती शैली (एकप्रकारे नागर शैलीच) – काळ्या बेसाल्ट दगडात कोरलेली, विशिष्ट जोडणी पद्धतीने उभी राहिलेली – जिथे ना चुन्याचा वापर ना लोखंडाचा. हे मंदिरे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा जिवंत इतिहास आहेत.
या मंदिरांचे अंगण म्हणजे समाजाच्या प्रत्येक थराने अनुभवलेले, स्वीकारलेले आणि सामूहिक भावनेने जपलेले स्थळ. जात, पंथ, वय, लिंग – यांना मागे टाकून मंदिर हे सगळ्यांचे असते. भक्ती आणि श्रध्दा यांच्या संगमावर उभे असलेले हे मंदिरे, समाजाच्या समतेची आणि एकतेची शिकवण देतात. जगाच्या गोंगाटात भरकटलेले मन मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचले की शांत होते. भक्तीने ते विरघळते. हा क्षण म्हणजे अध्यात्मिक मुक्ति.
"सह्याद्रीच्या मंदिरांमध्ये गाभाऱ्यात देव असतो,
पण प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणात त्याची प्रतिमा उमटलेली असते."
No comments:
Post a Comment