Monday, 11 May 2026

अंदमान | अंडमान | ANDAMAN | निसर्ग, इतिहास आणि सामरिक महत्त्वाची भूमी

 

Andaman and Nicobar Islands हा भारताचा एक अद्वितीय केंद्रशासित प्रदेश असून, बंगालच्या उपसागरात वसलेला आहे. सुमारे 572 बेटांचा हा समूह निळ्याशार समुद्र, पांढऱ्या शुभ्र वाळूचे किनारे आणि घनदाट उष्णकटिबंधीय जंगलांनी समृद्ध आहे. या बेटांपैकी काहीच बेटांवर मानवी वस्ती आहे, तर उर्वरित बेटे आजही नैसर्गिक स्वरूपातच जतन केलेली आहेत. भौगोलिकदृष्ट्या पाहता, अंदमान बेटे ही भारतीय उपखंडापासून दूर असली तरी दक्षिण-पूर्व आशियाच्या जवळ आहेत. या बेटांची निर्मिती ज्वालामुखी आणि भूकंपीय हालचालींमुळे झाली असून, आजही येथे Barren Island सारखा भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी पाहायला मिळतो. यामुळे या प्रदेशाचे भूगर्भशास्त्रीय महत्त्वही खूप मोठे आहे.

सामरिक दृष्टिकोनातून पाहिले तर, अंदमान-निकोबार बेटे भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात. हे बेटे Malacca Strait जवळ असल्यामुळे जागतिक सागरी व्यापार मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी भारताला मोठा फायदा होतो. त्यामुळे भारतीय नौदल आणि संरक्षण यंत्रणेसाठी हा प्रदेश एक मजबूत तळ म्हणून ओळखला जातो.

इतिहासाच्या पानांत डोकावल्यास, अंदमान बेटांचा एक वेगळाच आणि भावनिक अध्याय उलगडतो. ब्रिटिश काळात येथे भारतीय स्वातंत्र्यसैनिकांना शिक्षा देण्यासाठी Cellular Jail या कुप्रसिद्ध तुरुंगात ठेवले जात असे. ‘काळापाणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी अनेक क्रांतिकारकांनी अमानुष यातना सहन केल्या. विनायक दामोदर सावरकर यांसारख्या महान स्वातंत्र्यसैनिकांनी येथे कारावास भोगला, ज्यामुळे या भूमीला एक पवित्र आणि प्रेरणादायी ओळख प्राप्त झाली आहे. याशिवाय, दुसऱ्या महायुद्धादरम्यान Japanese Occupation of Andaman Islands या काळात जपानी सैन्याने या बेटांवर ताबा मिळवला होता. त्या काळातही या बेटांचे सामरिक महत्त्व अधोरेखित झाले.

अशा प्रकारे, अंदमान म्हणजे केवळ सुंदर समुद्रकिनारे नव्हे, तर निसर्ग, इतिहास आणि सामरिक ताकदीचा एक अद्भुत संगम आहे. या सर्व गोष्टींचा अनुभव घेण्यासाठीच आम्ही २२ एप्रिल ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत या नयनरम्य प्रवासाला निघालो होतो…

दिवस १ : पोर्ट ब्लेअर - सेल्यूलर जेल 

२२ एप्रिल २०२६... दीर्घ प्रवासानंतर आमचं विमान Veer Savarkar International Airport येथे उतरलं आणि त्या क्षणीच मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली. समुद्राने वेढलेली, निसर्गाने नटलेली ही भूमी आम्हाला आपल्यात सामावून घेण्यासाठी सज्ज होती. एअरपोर्टवरून हॉटेलकडे प्रस्थान करताना रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी दिसणारी हिरवळ आणि समुद्राची हलकी झलक प्रवासाचा थकवा क्षणात घालवून टाकत होती. हॉटेलमध्ये चेक-इन केल्यानंतर मस्त नाश्ता करून आम्ही थोडावेळ विश्रांती घेतली - कारण पुढे होता एक भावनिक आणि ऐतिहासिक अनुभव.

दुपारी सुमारे २:३० वाजता आम्ही निघालो एका अशा ठिकाणी, जिथे प्रत्येक वीट इतिहास सांगते - Cellular Jail. ‘काळापाणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी पाऊल टाकताच वातावरणात एक वेगळीच गंभीरता जाणवत होती. त्या भिंती, त्या कोठड्या… सगळं काही जणू त्या काळातील वेदना आणि संघर्ष आजही जिवंत ठेवून होतं.

इथे उभं राहून मन आपोआपच नतमस्तक होतं -  वीरता, शौर्य आणि बलिदान यांची जाणीव प्रत्येक क्षणी होत होती. ज्या क्रांतिकारकांनी देशासाठी सर्वस्व अर्पण केलं, त्यांच्या आठवणींनी डोळे नकळत ओलावले. सायंकाळी झालेला Light & Sound शो हा अनुभव आणखी खोलवर घेऊन गेला. त्या कथनातून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास जिवंत झाला आणि त्या शहीद वीरांना पुन्हा एकदा मनापासून नमन करण्याची संधी मिळाली. त्या भारावलेल्या मनःस्थितीत आम्ही हॉटेलवर परतलो. शांतपणे जेवण करून दिवसाच्या आठवणींना मनात साठवत झोपेच्या अधीन झालो -  कारण हा फक्त प्रवासाचा आरंभ होता… पुढे अजून खूप काही अनुभवायचं होतं.

दिवस २ : पोर्ट ब्लेअर - रॉस आयलँड - कोरल आयलॅंड  

निळ्या पाण्याच्या आत दडलेलं जिवंत विश्व सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे ताज्या नाश्त्याने झाली, पण आजचा दिवस खास होता - कारण आम्ही निसर्गाच्या एका वेगळ्याच रूपाला भेटणार होतो. पूर्ण तयारी करून आम्ही बाहेर पडलो आणि समुद्राच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला.

आजचा पहिला टप्पा होता Ross Island -

Ross Island ला जाण्यासाठी पोर्ट ब्लेअरहून नियमित फेरी (boat) सेवा उपलब्ध आहे. साधारण 15–20 मिनिटांचा प्रवास असतो. ब्रिटिश काळातील अवशेष आणि निसर्गाने परत आपल्या कवेत घेतलेली एक सुंदर जागा. जुन्या इमारतींवर पसरलेली झाडांची मुळे, शांत वातावरण… जणू इतिहास आणि निसर्ग एकत्र नांदत होते.

Ross Island (आज अधिकृत नाव Netaji Subhash Chandra Bose Island) हे अंदमानमधील एक अत्यंत सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. पोर्ट ब्लेअरपासून अगदी काही मिनिटांच्या बोट प्रवासावर असलेले हे बेट एकेकाळी ब्रिटिशांचे प्रशासनिक मुख्यालय होते. ब्रिटिश राजवटीत Ross Island हे अंदमानचं “Headquarters” होतं. येथे ब्रिटिश अधिकारी राहायचे, चर्च, बेकरी, स्विमिंग पूल, क्लब हाउस अशा अनेक सुविधा होत्या. पण 1941 मधील भूकंप आणि नंतर जपानी आक्रमणामुळे हे ठिकाण हळूहळू ओस पडले. शिवाय सुनामी मुळे देखील बऱ्याच तडाखा झालेला जाणवतो. आजही त्या जुन्या इमारतींचे अवशेष झाडांच्या मुळांमध्ये गुंतलेले दिसतात - जणू निसर्गाने इतिहासाला कवटाळलं आहे.

आज Ross Island पूर्णपणे हिरवाईने नटलेलं आहे. मोठमोठी झाडं आणि त्यांच्या मुळांनी झाकलेले अवशेष मुक्तपणे फिरणारे हरण (Deer), मोर (Peacocks), शांत, स्वच्छ वातावरण येथील निसर्ग आणि इतिहास यांचा सुंदर संगम पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देतो. पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे जुनं चर्च (British Church ruins), Chief Commissioner’s House चे अवशेष, लाइटहाऊस, जपानी बंकर (World War II काळातील) समुद्रकिनाऱ्यावरून दिसणारे सुंदर दृश्य. 

त्यानंतर आम्ही पोहोचलो North Bay Island  -  ज्याला Coral Island म्हणूनही ओळखलं जातं. इथून खऱ्या अर्थाने समुद्रातील जादुई दुनियेची सुरुवात झाली. हे बेट खास करून प्रवाळ खडक (coral reefs) आणि स्वच्छ निळं पाणी यासाठी प्रसिद्ध आहे.  इथलं पाणी इतकं स्वच्छ आणि पारदर्शक आहे की बोटीवरूनच समुद्राचा तळ स्पष्ट दिसू लागतो, म्हणजेच glass-like visibility सूर्यकिरण पाण्यात शिरून खालीपर्यंत पोहोचतात आणि त्या प्रकाशात चमकणारे प्रवाळ (Corals) म्हणजे एक जिवंत कलाकृतीच वाटते. हे प्रवाळ म्हणजे साधे दगड नाहीत, तर अतिशय सूक्ष्म सजीवांनी तयार केलेली रचना असते - समुद्रातील एक संपूर्ण ecosystem!

पाण्याखाली दिसणारे रंगीबेरंगी मासे, त्यांच्या लयबद्ध हालचाली, आणि आजूबाजूला असलेले विविध समुद्री जीव जसे की sea anemones, starfish, sea cucumbers … हे सगळं इतकं मंत्रमुग्ध करणारं होतं की वेळ कसा गेला ते कळलंच नाही. इथे विविध water sports activities चा आनंद घेता येतो -  underwater sea walk, scuba diving, snorkeling, marine safari… प्रत्येक अनुभव वेगळा आणि थरारक! मी स्वतः Glass-bottom boat ride मधून समुद्राच्या तळाशी असलेलं अद्भुत जग पाहिलं. काचेतून दिसणारे दृश्य म्हणजे जणू एखाद्या documentary मधील live प्रसंग -  आजूबाजूला फिरणारे रंगीत मासे, हळूहळू हलणारी जिवंत प्रवाळं, आणि समुद्रातील शांत पण जिवंत हालचाल… शब्दांत मांडणं खरंच कठीण आहे. त्या क्षणी असं वाटलं की आपण एका वेगळ्याच ग्रहावर आलो आहोत - जिथे आवाज नाही, गडबड नाही… फक्त निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य आणि शांतता आहे. हा दिवस केवळ “भेट” नव्हता, तर समुद्राच्या आतल्या जगाशी झालेली एक अविस्मरणीय ओळख होती.

पाण्यातील त्या अद्भुत जगाचा आनंद घेऊन झाल्यावर मस्त गरमागरम जेवण, त्यानंतरचे  लोकल शॉपिंग करून आम्ही पुन्हा आमच्या हॉटेल मध्ये परतलो आणि आजचा दिवस संपला.

दिवस ३ : बारटांग आयलँड - मड व्होल्कॅनो - रंगत स्टे 

आजचा दिवस थोडा धावपळीचा असणार होता, त्यामुळे आम्हाला लवकर निघणं गरजेचं होतं. आजचा मुख्य टप्पा होता Baratang Island 

अंदमानमधील बाराटांग बेट हे पोर्ट ब्लेअरपासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर वसलेले एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. उत्तर अंदमानकडे जाण्यासाठी ग्रँड अंदमान ट्रंक रोड हा मुख्य मार्ग मानला जातो आणि याच रस्त्याने बाराटांग बेटापर्यंत पोहोचता येते. पोर्ट ब्लेअरहून बाराटांगकडे जाणारा प्रवास साधारण अडीच तासांचा असून तो दोन टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. पहिला टप्पा म्हणजे पोर्ट ब्लेअर ते जिरकाटांग आणि दुसरा टप्पा जिरकाटांग ते बाराटांग असा आहे. प्रवासादरम्यान घनदाट जंगल, हिरवाईने नटलेले रस्ते आणि निसर्गरम्य दृश्यांचा मनमुराद आनंद घेता येतो. त्यामुळे बाराटांगकडे जाणारा प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यापुरता मर्यादित राहत नाही, तर तो एक सुंदर आणि संस्मरणीय अनुभव ठरतो.

हे ठिकाण त्याच्या Limestone Caves आणि Mud Volcano साठी प्रसिद्ध आहे. पण इथे भेट द्यायची असेल तर सकाळी लवकर निघणं अत्यावश्यक असतं. कारण परमिट्स सकाळी दिले जातात आणि पुढे जारवा राखीव क्षेत्रातून (Jarawa Reserve) ठराविक तुकड्यांमध्ये, म्हणजेच convoy मध्येच प्रवास करावा लागतो. हा अनुभव थोडा वेगळा आणि शिस्तबद्ध असतो.

सकाळची सुरुवातच प्रवासाच्या उत्साहाने झाली. रस्त्यावर अजूनही शांतता होती आणि हवेत एक वेगळीच ताजगी जाणवत होती. आमचा पहिला थांबा होता Jirkatang Check Post जवळ. तिथे आम्ही ब्रेकफास्ट केला आणि पुढे जाण्यासाठी आमचा नंबर येण्याची वाट पाहू लागलो.

थांबलेल्या वेळेत पक्षीनिरीक्षणाचा छान योग आला. आजूबाजूच्या झाडांवर वेगवेगळ्या पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती. त्या परिसरात जारवा आदिवासींसाठी सुरक्षा पोलीस चौकी होती, त्यामुळे सगळीकडे नियम आणि शिस्त जाणवत होती. विशेष म्हणजे तिथली वॉशरूम्स खूपच स्वच्छ होती आणि बाजूलाच एक छोटेसे मंदिरही होते - प्रवासाला एक वेगळंच समाधान देणारं.

थोड्याच वेळात आमचा प्रवास पुढे सुरू झाला, विशेषतः “Middle Strait” भागातून मार्ग काढत बस पुढे निघाली. घनदाट जंगलातून जाणारा हा रस्ता म्हणजे निसर्गाच्या कुशीतून चाललेली एक सफरच वाटत होती. जवळपास चार तासांचा प्रवास करून आम्ही Middle Strait येथे पोहोचलो. तिथून पुढे जेट्टीने प्रवास करायचा होता. छोट्या बोटीतून फक्त दहा मिनिटांत आम्ही समोरच्या किनाऱ्यावर पोहोचलो. आमची बस मागून येणार होती, त्यामुळे थोडा वेळ होता. तो वेळ आम्ही तिथल्या Baratang Interpretation Center मध्ये घालवला.

या सेंटरमध्ये बरीच माहितीपूर्ण गोष्टी पाहायला मिळाल्या. Limestone Cave ची छोटी प्रतिकृती पाहून पुढे काय अनुभव मिळणार आहे याची उत्सुकता वाढली. तसेच आदिवासी जमातींची मॉडेल्स, कांदळवन (Mangroves), Mud Volcano याबद्दल माहिती, विविध वनस्पती आणि वनप्रजाती यांची ओळख करून देण्यात आली होती.

आमची बस फायनली जलमार्गातून आली आणि आमचा प्रवास पुनः सुरू झाला. काही वेळातच आम्ही पोहोचलो निसर्गाचा एक चमत्कार पाहायला, म्हणजेच Mud Volcano पाहायला. हा भारतातील एक अत्यंत दुर्मीळ आणि वेगळा भौगोलिक प्रकार आहे. भारतातील एकमेव सक्रिय मड व्होल्कॅनो म्हणून याची ओळख आहे. सामान्य ज्वालामुखीप्रमाणे यातून गरम लावा बाहेर येत नाही, तर थंड चिखल, वायू आणि पाणी बाहेर पडतं. त्यामुळे लहान-लहान बुडबुडे तयार होतात आणि छोट्या शंकूसारख्या रचना दिसतात. निसर्गाची ही किमया प्रत्यक्ष पाहणे म्हणजे खरोखरच एक वेगळाच अनुभव होता. तेथे जाण्यासाठी एक वाट आहे. अगदी १०-१५ मिनिटांत आपण त्या जागेवर पोहोचतो. प्रचंड उष्मा जाणवत होता. चिखलाचा ढीग तो देखील ओला – सुखा भाग. तडे गेल्या सारखी जमीन आणि बुडबुडे येणारा तो भाग.

हा सगळा अनुभव घेताना जाणवलं - निसर्ग किती विविधरंगी आणि अद्भुत आहे! प्रत्येक ठिकाण काहीतरी नवीन शिकवून जातं. यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. वाटेतच जेवण केलं - साधं पण अतिशय चविष्ट. प्रवासामुळे भूकही छान लागली होती, त्यामुळे जेवणाचा आनंद द्विगुणित झाला.

वाटेत एक पूल लागला आणि आजूबाजूला असणारे सुखावह दृश्य पाहून थांबायचा मोह झाला. पाणी आणि आजूबाजूला असणारे कंदळवन अप्रतिम ! त्यावर सोनेरी सूर्यप्रकाश तर निसर्गाची शोभा अजून वाढवत होता. थोडी मजा केली आणि पुनः निघालो व शेवटी आम्ही "रंगत" येथे मुक्कामासाठी पोहोचलो. रात्रीचं जेवणही तितकंच मस्त झालं. दिवसाचा थकवा आणि समाधान दोन्ही मनात घेऊन आम्ही आरामात झोपलो. त्या दिवशीचा अनुभव मनात कायमचा साठवून ठेवण्यासारखा होता.

दिवस ४  : रंगत - अमकुंज बीच - धानी नाला  - कालीपूर बीच -  डिगलीपूर 

सकाळी आवरून, छान ब्रेकफास्ट करून आमची “जत्रा” पुढे निघाली. प्रवास सुरू असतानाच मध्येच एक अप्रतिम समुद्रकिनारा दिसला - Amkunj Beach. इथे तर आमच्या ग्रुपशिवाय कोणीच नव्हतं! स्वच्छ, निर्मळ किनारा… लाटांचा मंद गाज… आणि पाण्याचा फिकट निळसर-हिरवा रंग - सगळंच इतकं शांत आणि सुंदर होतं की काही क्षण आपण कुठल्या स्वर्गात आलोय असं वाटावं. किनाऱ्यावर उभं राहून येणाऱ्या लाटांकडे पाहत राहावं असंच वाटत होतं. इथलं ताजं नारळपाणी पिऊन तर अजूनच ताजेतवाने झालो आणि पुढच्या प्रवासाला निघालो.

अर्ध्या तासातच आम्ही पुढच्या ठिकाणी पोहोचलो - धानी नाला Dhani Nallah Mangrove Walkway. इथला Mangrove Walkway म्हणजे निसर्गाच्या कुशीतून चाललेली एक शांत सफरच ! लाकडी पायवाटेवरून जवळपास एक किलोमीटर चालताना आजूबाजूला दाट कांदळवन, त्यातला ओलसर गंध, आणि सतत ऐकू येणारे पक्ष्यांचे आवाज - खरंच मनाला सुखावून टाकणारा अनुभव होता. कधी एखादा पक्षी झाडावरून उडत जाताना दिसायचा, तर कधी एखादं पान हलताना दिसायचं. सगळीकडे एक समृद्ध, जिवंत आणि शांत वातावरण जाणवत होतं.

या वॉकवेच्या शेवटी पुन्हा एक सुंदर समुद्रकिनारा भेटला. इथेही आम्हीच होतो - निवांत, शांत आणि निसर्गाच्या सान्निध्यात हरवलेले. जवळपास दोन तास तिथे मजा करत, फोटो काढत आणि फक्त तो क्षण जगत घालवले… आणि मग परतीचा प्रवास सुरू केला.

पुढचा प्रवास मात्र खूप वेळखाऊ होता. लांबचा रस्ता, थोडा थकवा… पण नवीन ठिकाणाची उत्सुकता कायम होती. शेवटी दुपारी साडेतीनच्या सुमारास आम्ही Diglipur येथे आमच्या रिसॉर्टवर पोहोचलो. तेथे पोहोचताच गरमागरम जेवण आमची वाट पाहत होतं. थोडंसं फ्रेश होऊन आम्ही जेवणावर अक्षरशः ताव मारला! मग चेक-इन करून थोडा आराम घेतला.

संध्याकाळी आम्ही जवळच असलेल्या Kalipur Beach वर गेलो. हा समुद्रकिनारा खरंच विलक्षण सुंदर होता. आजूबाजूला कोरलचे दगड, किनाऱ्यावर धावणारे छोटे पक्षी, वाळूत आपली घरं बनवलेले खेकडे… आणि मध्येच इकडून तिकडे उड्या मारत जाणारे mudskippers - सगळं काही जिवंत आणि समृद्ध वाटत होतं.

संध्याकाळचा तो संधीप्रकाश - आकाशात पसरलेले केशरी, गुलाबी आणि जांभळे रंग… समुद्रावर पडणारी त्यांची छटा… आणि हलक्या वाऱ्यासोबत येणारा खारट गंध - हा सगळा अनुभव शब्दात मावणं कठीणच! त्या क्षणी वेळ थांबून राहावी असं वाटत होतं. हा सुंदर अनुभव मनात साठवत आम्ही परत रिसॉर्टवर आलो. दिवसाचा थकवा होता, पण मन मात्र पूर्णपणे तृप्त झालं होतं.

दिवस पाचवा : डिगलीपुर - रॉस अँड स्मिथ आयलँड - रंगत  

डिगलीपूरचा अविस्मरणीय सूर्योदय आजचा दिवस खास ठरणार हे आधीच ठरलेलं होतं. Kalipur Beach - हा बीच विशेषतः कासवांच्या अंडी घालण्याच्या प्रक्रियेसाठी प्रसिद्ध आहे. नोव्हेंबर ते मार्च दरम्यान येथे कालिपुर बीचवर कासवांच्या चार दुर्मिळ प्रजाती - ऑलिव्ह रिडले (Olive Ridley), ग्रीन टर्टल्स (Green Turtles), हॉक्सबिल (Hawks Bill) आणि लेदरबॅक (Leather Back) - अंडी घालण्यासाठी येतात. आणखी एक खास गोष्ट म्हणजे येथे ओहोटीच्या वेळेला दिसणारे सुंदर कोरल. समुद्राचं पाणी मागे गेल्यावर किनाऱ्यावर प्रवाळ, शंख आणि लहान समुद्री जीव दिसू लागतात.

शिवाय इथं एक गोष्ट विशेष आहे - येथील समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्त दिसत नाही, पण सूर्योदय मात्र अगदी जादुई अनुभव देतो. त्यामुळे आज आम्ही ठरवूनच लवकर उठलो. सकाळी साडेचार वाजताच वातावरणात हलका उजेड जाणवू लागला. शांतता, गार वारा आणि नव्या दिवसाची चाहूल - सगळंच खूप प्रसन्न होतं. समुद्र अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर असल्यामुळे आम्ही लगेचच किनाऱ्यावर पोहोचलो.

हळूहळू आकाशात लाली पसरायला सुरुवात झाली. सुरुवातीला फिकट केशरी, मग गुलाबी, आणि नंतर गडद लाल रंगांनी आकाश रंगून गेलं. काही क्षणातच समुद्राच्या काठावरून एक सुंदर गुलाबी गोळा वर येताना दिसला - तो म्हणजे उगवता सूर्य! समुद्राच्या शांत पाण्यावर त्या सूर्याची पडलेली सोनेरी छटा… हलक्या लाटांवर चमकणारा प्रकाश… आणि आजूबाजूची शांतता - हा सगळा अनुभव शब्दांच्या पलीकडचा होता.

त्या क्षणी वेळ थांबून राहावी असं वाटत होतं. फक्त आपण, समोर अथांग समुद्र, आणि हळूहळू उगवणारा सूर्य - निसर्गाची ही किमया डोळ्यात साठवून ठेवावी अशीच होती. थोडा वेळ त्या सुंदर क्षणात हरवून आम्ही परत रिसॉर्टवर आलो. आवरून, गरमागरम चहा आणि नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासासाठी तयार झालो. नेहमीप्रमाणे उत्साह कायम ठेवत आम्ही निघालो आणि साधारण 08:45 वाजता जेट्टीवर पोहोचलो - पुढच्या नव्या अनुभवासाठी सज्ज!

जेट्टीवरून बोट पकडून आम्ही पुढे निघालो - आजचा सगळ्यात खास टप्पा म्हणजे Ross and Smith Islands! साधारण अर्ध्या तासाच्या बोटीच्या प्रवासानंतर आम्ही त्या बेटांवर पोहोचलो… आणि खरंच - पहिल्याच क्षणी तोंडातून निघालं, “आह्ह… किती सुंदर!”

समोर दिसत होतं एक वेगळंच जग. नितळ, पारदर्शक पाणी - इतकं स्वच्छ की तळ अगदी स्पष्ट दिसत होता. पाण्याचा रंग तर अगदी फिरोजी निळा - कधी फिकट, कधी गडद, आणि सूर्यप्रकाश त्यावर पडताच सोनेरी झळाळी निर्माण होत होती. दोन्ही बेटांना जोडणारी पांढरी शुभ्र वाळूची पट्टी - जणू निसर्गाने स्वतः काढलेली रेषाच! एका बाजूला शांत समुद्र, तर दुसऱ्या बाजूला थोड्या हलक्या लाटा - हा विरोधाभासही तितकाच मोहक.

किनाऱ्यावर उभ्या असलेल्या नारळाच्या उंच झाडांची सावली, हलकासा वाहणारा वारा, आणि लाटांचा मंद आवाज - सगळं काही इतकं शांत आणि सुंदर होतं की वेळेचं भानच राहिलं नाही. आणि मग सुरू झाली खरी मजा! त्या नितळ पाण्यात उतरल्यावर तर जणू आपण दुसऱ्याच जगात आलोय असं वाटलं. पाण्यातच छोटे छोटे मासे फिरताना स्पष्ट दिसत होते. आपण जिथे उभे तिथेच ते आपल्या भोवती फिरत होते - भीती न बाळगता! पाण्यात चालताना पायाखाली मऊ वाळू, आणि समोर अथांग निळाई - हा अनुभव मनसोक्त भिजून घेण्यासारखाच होता.

कधी सोबत्यांचे पाण्यात डुंबणं पाहणं, कधी किनाऱ्यावर बसून निसर्ग पाहणं, कधी फोटो काढणं - असं करत करत वेळ कसा गेला तेच कळलं नाही. हा अनुभव म्हणजे केवळ पर्यटन नव्हतं, तर निसर्गाशी झालेला एक शांत संवाद होता.

साधारण एक वाजता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. मन मात्र अजूनही त्या बेटावरच अडकून राहिलं होतं. परत येऊन जेवण केलं आणि मग पुन्हा आम्ही रंगत या ठिकाणी पोहोचलो. चेक-इन झाल्यावर थोडं आवरून, संध्याकाळचं जेवण केलं आणि मग दिवसाचा सगळा सुंदर अनुभव मनात साठवत निवांत झोपून गेलो. आजचा दिवस म्हणजे निसर्गाच्या स्वर्गीय सौंदर्याचा खरा आस्वाद होता.

दिवस सहावा : रंगत - लाईमस्टोन केव्ह्स - पोर्ट ब्लेअर

आजचा दिवस खरोखरच खास होता – Baratang Island येथील Limestone Caves पाहण्याचा! सकाळी लवकर उठून सगळं आवरलं आणि 06:15 ला बाहेर पडलो. दरवाजा उघडताच थेट सूर्य डोळ्यांवर – इतका प्रखर प्रकाश की क्षणभर वाटलं जणू दुपारचे १२ वाजले आहेत ! ७ वाजता बस सुटली आणि प्रवास सुरू झाला. मध्ये Kadamtala येथे नाश्त्यासाठी थांबलो. साधा पण ताजा नाश्ता करून पुन्हा प्रवास सुरू केला आणि लवकरच जेट्टी गाठली. तिथून बोटीने कांदळवनात (mangroves) प्रवेश केला – हा अनुभव तर अविस्मरणीय!

बोट झाडांच्या दाट फांद्यांच्या सावल्यातून हळूहळू पुढे जात होती. शांत पाणी, भोवती हिरवळ, आणि त्या झुडपांमधून येणारी हलकी गार हवा – जणू आपण एखाद्या वेगळ्याच जगात प्रवेश केला आहे अशी भावना. त्यानंतर लाकडी पुलावरून १५-२० मिनिटे चालत आत गेलो. आजूबाजूला समृद्ध अशी कांदळवन. भरती-आहोटी चा अंदाज येत होता. झाडांची (कांदळवन) मुळे दिसत होती.

त्यानंतर गावचा भाग, गवत व आजूबाजूला असणारी उंचच उंच झाडे पाहत पुढे निघालो आणि मग दिसली ती निसर्गाची अद्भुत कलाकृती – Limestone Caves!

या गुहा म्हणजे हजारो वर्षांच्या प्रक्रियेत तयार झालेली रचना. पावसाच्या पाण्यात विरघळलेले कॅल्शियम कार्बोनेट हळूहळू टपकत खाली येतं आणि त्यातून तयार होतात लवणस्तंभ (stalactites वरून खाली येणारे आणि stalagmites जमिनीवरून वर वाढणारे). काही ठिकाणी हे दोन्ही एकत्र येऊन पूर्ण स्तंभ तयार झालेले दिसतात – जणू निसर्गाने स्वतः शिल्पकला केली आहे.

गुहेतली वाळू हलक्या प्रकाशात चमकत होती, आणि वातावरणात एक थंड, ओलसर शांतता होती. अचानक आम्हाला एक सर्पही दिसला – त्यामुळे थोडा थरारही अनुभवायला मिळाला! ही गुहा सुमारे १०० मीटर लांब आहे. त्यातील ४०% भाग अजूनही “live” म्हणजे सक्रिय आहे – म्हणजेच नवीन रचना अजूनही तयार होत आहेत, तर ६०% भाग “dead” आहे, जिथे प्रक्रिया थांबलेली आहे. सगळं पाहून परतीचा प्रवास सुरू केला. जेट्टीवर परत येऊन जेवलो आणि मग पुढे निघालो. Middle Strait मार्गे Port Blair कडे प्रस्थान केलं.

रस्त्यात Jarawa Tribe चे काही लोक दिसले. त्यांच्याजवळ गाडी थांबवण्यास परवानगी नसते, त्यामुळे फक्त दूरूनच त्यांना पाहता आलं – एक वेगळाच अनुभव. संध्याकाळी पोर्ट ब्लेअरला परतलो. फ्रेश झालो, जेवलो, मग गाणी, गप्पा आणि भरपूर मजा केली… आणि दिवसाचा सुंदर शेवट गाढ झोपेत झाला.

दिवस सातवा : पोर्ट ब्लेअर -  चॅथम सॉ मिल - समुद्रिका - सागरिका एम्पोरियम - फ्लॅग पॉईंट - पोर्ट ब्लेअर

आजचा दिवस पूर्णपणे सुखाचा आणि निवांत होता. सकाळी आरामात उठलो — कुठलीही घाई नाही, फक्त enjoy mood! आजचं प्लॅन होतं लोकल sightseeing.

सर्वात आधी भेट दिली Chatham Saw Mill ला. ही आशियातील सर्वात जुन्या आणि मोठ्या सॉ मिल्सपैकी एक आहे. ब्रिटिशकालीन काळात (British era) याची स्थापना झाली होती, मुख्यतः लाकूड प्रक्रिया करण्यासाठी. इथे प्रचंड मोठमोठी लाकडं कापण्यासाठी वापरली जाणारी यंत्रं पाहून आश्चर्य वाटतं. जुन्या काळात इतक्या advanced पद्धतीने काम होत होतं, हे पाहून थक्क व्हायला होतं. 

येथे एक सोवेनियर शॉप आहे व येथील भेटवस्तू तुम्ही आठवण म्हणून विकत घेऊ शकता. शिवाय येथे संग्रहालयही आहे जिथे त्या काळातील साधनं आणि माहिती जपून ठेवलेली आहे. गाईड सर्व माहिती आपणास देतात. 

चॅथम सॉ मिलमध्ये प्रवेश करताच जुन्या ब्रिटिशकालीन औद्योगिक वारशाचा अनुभव येतो. आत असलेल्या संग्रहालयात अंदमानातील वनसंपदा आणि इतिहासाची माहिती मिळते, तर गाइड प्रत्येक मशीन आणि प्रक्रियेबद्दल रोचक माहिती सांगतात. मोठ्या चालू यंत्रणा पाहण्यासाठी पर्यटकांना रंगीत जॅकेट दिले जाते आणि मगच आत प्रवेश दिला जातो. प्रचंड लाकडी ओंडक्यांचे रूपांतर होताना पाहणे हा खरोखरच थरारक आणि शैक्षणिक अनुभव ठरतो. 

शिवाय येथील चॅथम मेमोरियल हे अंदमानच्या इतिहासातील एक भावनिक आणि अभिमानास्पद ठिकाण आहे. 1857 च्या स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाची आठवण जपणारे हे स्मारक भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या वेदना आणि बलिदानाची साक्ष देते. समुद्राच्या शांत वातावरणात उभे असलेले हे स्मारक इतिहास, देशभक्ती आणि अंदमानच्या वारशाची जाणीव करून देते.

त्यानंतर आम्ही गेलो Naval Marine Museum Samudrika येथे. हे म्युझियम Indian Navy द्वारे चालवलं जातं आणि अंडमान-निकोबारच्या सागरी जीवनाबद्दल सखोल माहिती देतं. 

संग्रहालयात पाच वेगवेगळे विभाग आहेत — समुद्री जीवसृष्टी, अंदमानचा इतिहास, भूगोल, आदिवासी संस्कृती आणि पुरातत्त्व माहिती. येथे विविध प्रकारचे प्रवाळ (Corals), शंख-शिंपले, दुर्मिळ मासे, समुद्री जीवांचे नमुने आणि मोठ्या व्हेल माशाचा सांगाडा पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरतो. काही विभागांमध्ये आधुनिक नौदल जहाजांची रचना, उपकरणे आणि सागरी संरक्षण तंत्रज्ञानाची माहिती देखील दिली जाते. 

समुद्र आणि संरक्षण यांचा अद्भुत संगम अनुभवायचा असेल तर समूद्रिका नेव्हल मरीन म्युझियमला भेट द्यायलाच हवी. भारतीय नौदलाद्वारे सुसज्ज केलेल्या या संग्रहालयात आधुनिक युद्धनौका, विमाने, समुद्री सुरक्षा तंत्रज्ञान आणि अंदमानच्या सागरी जैवविविधतेची माहिती प्रभावीपणे मांडलेली आहे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचे सागरी धोरण व कार्य किती महत्वाचे होते हे देखील येथील प्रदर्शनात पाहून मन एकदम भारावून गेले. 

समुद्राखालील जग किती सुंदर आणि विविधतेने भरलेलं आहे, याची खरी जाणीव इथे होते. विविध मॉडेल्स, नौदल यंत्रणा आणि विशाल समुद्री जीवांचे नमुने पाहताना विज्ञान, इतिहास आणि देशरक्षण यांचा एक वेगळाच अनुभव मिळतो. 

मग जेवण आटोपून आम्ही शॉपिंगसाठी गेलो Sagarika Government Emporium येथे. हे अंडमान-निकोबारचं प्रसिद्ध सरकारी एम्पोरियम आहे.

इथे शंखापासून बनवलेल्या वस्तू, लाकडी कलाकुसर, हाताने बनवलेले दागिने, सजावटीच्या वस्तू - सगळंच unique आणि सुंदर! प्रत्येक वस्तूमध्ये स्थानिक संस्कृतीची झलक दिसते, त्यामुळे इथलं शॉपिंग म्हणजे फक्त खरेदी नाही तर एक अनुभवच असतो.

यानंतर आम्ही भेट दिली Flag Hoisting Point ला - Netaji Subhash Chandra Bose Island (पूर्वीचं नाव Ross Island). सुभाषचंद्र बोस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्यांनी Azad Hind Government स्थापन करून ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा उभारला. इथेच Subhas Chandra Bose यांनी 30 डिसेंबर 1943 रोजी भारतीय तिरंगा फडकावला होता. हा क्षण अत्यंत ऐतिहासिक होता, कारण हीच ती वेळ होती जेव्हा अंडमान-निकोबार बेटांवर प्रथमच भारतीय स्वातंत्र्याची घोषणा प्रत्यक्षात दाखवली गेली.

हा Flag Point म्हणजे केवळ एक ठिकाण नाही, तर भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची साक्ष देणारा एक अभिमानाचा क्षण आहे. संध्याकाळी परतलो — थोडा आराम, गप्पा, आणि दिवसाच्या आठवणींमध्ये हरवून गेलो… एकदम शांत आणि समाधान देणारा दिवस.

अंदमानचा हा शेवटचा दिवस… मनात एक वेगळीच शांतता आणि हलकीशी ओढ घेऊन उभा आहे. उद्या सकाळी पुन्हा आपल्या कर्मभूमीकडे परतायचंय… पण या वेळी मन मात्र इथेच कुठेतरी थांबून राहिलंय. हे काही दिवस केवळ प्रवास नव्हते, तर आयुष्याला नव्याने अनुभवण्याचा एक सुंदर अध्याय होता. प्रत्येक सकाळ नव्या उत्साहाने सुरू झाली, आणि प्रत्येक संध्याकाळ आठवणींच्या रंगांनी सजली. समुद्राच्या लाटा, निळाशार आकाश, आणि सगळ्यांची साथ… सगळंच काही मनात खोलवर कोरलं गेलंय. हसणं, गप्पा, छोट्या छोट्या गमती, कधी थोडासा थकवा पण त्यातही आनंद… हे सगळं इतकं मनापासून जगलो की आता ते सोडून जाणं जड जातंय. कधी वाटतं – वेळ इथेच थांबावी… आणि आपण हे क्षण पुन्हा पुन्हा जगत राहावं. या प्रवासाने आपल्याला फक्त ठिकाणं दाखवली नाहीत, तर एकमेकांशी नातं अजून घट्ट केलंय. ही साथ, हे क्षण, या आठवणी – आयुष्यभर जपून ठेवण्यासारख्या आहेत.

उद्या परत जाऊ… आपल्या कामांकडे, आपल्या दिनक्रमात… पण मनाच्या एका कोपऱ्यात "अंदमान" कायमचं घर करून राहील हा शेवट नाही… ही तर फक्त एका सुंदर आठवणीची सुरुवात आहे, कारण “अंतः अस्ति प्रारंभः.. ”




Saturday, 4 April 2026

श्री संगमेश्वर देवस्थान, हत्तरसंग कुडल, सोलापूर | Shree Sangameshwar Devasthan, Hattarsang Kudal | विजयपुरा (पूर्वीचे बिजापुर) | Solapur-Bijapur Tour

इतिहास हा केवळ भूतकाळ नसतो, तो दगडांत कोरलेला श्वास असतोआणि त्या श्वासाचा मागोवा घेत आम्ही बॅकपॅकर मंडळी निघालो होतो दक्षिण भारताच्या मंदिर वैभवाच्या अद्भुत प्रवासालामहाराष्ट्र-सोलापूर ते कर्नाटकातील चालुक्य, राष्ट्रकूट आणि होयसाळा परंपरेतील अजरामर वास्तुकलेचा शोध घेणारी ही आमचीAncient Temple Tour.

२०/१०/२०२५ ते २४/१०/२०२५ अशी आमची पाच दिवसाची रम्य आणि सकारात्मक अशी आमची एकंदर यात्रा होती. १९/१०/२०२५ रोजी आम्ही मुंबई-सोलापूर असा ट्रेन ने प्रवास केला भल्या पहाटे पोहोचलो सोलापूर येथे. हॉटेल नक्षत्रला थोडा वेळ का असेना आम्ही झोपायची सोय केली. सकाळी फ्रेश झालो. आमची गाडी हॉटेलच्या दारात स्वागतासाठी उभी होतीच. मस्त गरमागरम नाश्ता केला आणि प्रवास सुरू झाला.

दिवस : २०/१०/२०२५

श्री संगमेश्वर देवस्थान, हत्तरसंग कुडल (Sangameshwar Devasthan, Hattarsang Kudal)

संगमेश्वर व श्री हरिहरेश्वर मंदिर – महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर

सकाळची थंड हवा, शांत वातावरण आणि रस्त्यावरची कमी वर्दळ — अशा वातावरणात आम्ही सोलापूरहून हत्तरसंग कुडाळकडे निघालो. शहर मागे पडत गेले आणि हळूहळू ग्रामीण भाग, शेती, आणि मोकळा निसर्ग दिसू लागला. प्रवास खूपच सुखद वाटत होता. हत्तरसंग कुडाळ हे ठिकाण विशेष आहे कारण येथे दोन नद्यांचा संगम होतो. भीमा आणि सीना या नद्यांचा संगम येथे पाहायला मिळतो. या संगमावरच चालुक्यकालीन मंदिर स्थापत्यशैली, अप्रतिम व अनोखे शिल्पसौंदर्य, अत्यंत दुर्मीळ बहुमुखी शिवलिंग, तसेच शैव व वैष्णव पंथांचे सुंदर एकत्रीकरण—अशी अनेक वैशिष्ट्ये लाभलेले संगमेश्वर व हरिहरेश्वराचे मंदिर आपणास इथे पाहावयास मिळते.

संगमेश्वर मंदिरातील शिलालेखावरून हे मंदिर साधारणत: इ.स. १०१८ मध्ये बांधण्यात आल्याचे कळते. हे त्रिकूट म्हणजे तीन गर्भगृहे असलेले मंदिर आहे. चालुक्यांनंतरच्या काळात या मंदिराचा बऱ्याच वेळा जीर्णोद्धार झाला असावा, असे ऐकण्यात येते. येथील प्रवेशद्वार काहीसे उंच असून त्याच्या पायरीवर शुभचिन्हे कोरलेली आहेत. सभामंडपात मध्यभागी असलेल्या चार स्तंभांच्या मधील जागेत एका चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. गर्भगृहात असलेली शिवपिंडी शाळुंका उंच असून महादेवाचा पितळी मुखवटा आहे.

संगमेश्वर मंदिराच्या प्रांगणातून काही पायऱ्या उतरल्यावर हरिहरेश्वर मंदिराच्या विस्तीर्ण आणि शांत प्रांगणात प्रवेश होतो. या मंदिराची रचना अत्यंत सुबक आणि पारंपरिक असून त्यात मुखमंडप, सभामंडप, स्वर्गमंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे प्रमुख भाग समाविष्ट आहेत. येथील मुखमंडप खुल्या स्वरूपाचा असून, त्याची रचना विशेष लक्षवेधी आहे. समोरील बाजूस चौकोनी स्तंभपादावर उभारलेले स्तंभ विविध भौमितिक आकारांनी सजलेले आहेत—चौकोन, षट्कोन, अष्टकोन आणि वर्तुळ यांचा सुंदर संगम या स्तंभांमध्ये पाहायला मिळतो, जो त्या काळातील शिल्पकलेची समृद्धता दर्शवतो. मुखमंडपात एकाच दगडात पाठपोट कोरलेल्या दोन वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती विशेष आकर्षण ठरतात. यापैकी एक मूर्ती महालक्ष्मीची असून दुसरी भैरवी किंवा कालिका देवीची आहे. या मूर्तींच्या रचनेतून आणि तपशीलातून त्या काळातील कलाकारांची कुशलता आणि धार्मिक श्रद्धा स्पष्टपणे जाणवते.

महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांपैकी एक असलेले श्री हरिहरेश्वर मंदिर हे कल्याणीच्या चालुक्यांच्या काळात, .. ११व्या शतकाच्या प्रारंभी (सन १०१८ च्या सुमारास) बांधण्यात आलेले आहे. हे क्षेत्र शिव विष्णूचे एकत्रित सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मंदिर मानले जाते. उत्खननानंतर मंदिराचा सध्याचा अवशेष भाग स्पष्टपणे दिसून येतो. मंदिराच्या बांधकामात कोणत्याही सिमेंट किंवा चुना यांसारख्या माध्यमांचा वापर केलेला नाहीहे त्याच्या प्राचीन वास्तुशास्त्राचे एक विलक्षण वैशिष्ट्य आहे. मंदिराचे प्रमुख विभाग म्हणजे मुखमंडप, अंतराळ, गर्भगृह आणि इतर वास्तुशिल्प घटक. शिवाय उत्खननादरम्यान बऱ्याच सुंदर मूर्ती मिळाल्या आहेत. छतावरील शिल्पकला तर अप्रतिमच.

इ.स. १९९५ पूर्वी पर्यन्त सदर मंदिर पूर्णपणे मातीखाली गाडलेले होते. प्रा. गजानन भिडे (दयानंद महाविद्यालय, सोलापूर) यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने उत्खनन करून या प्राचीन हरिहरेश्वर मंदिराचा शोध लावला आणि ते पुन्हा प्रकाशात आणले.

या मंदिराची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे दोन गाभारे आहेत. डाव्या गाभाऱ्यात शिवलिंग विराजमान आहे, तर उजव्या गाभाऱ्यात मुरलीधर श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती आहे. या दोन गाभाऱ्यांच्या मध्ये देवकोष्ठामध्ये श्री गणेशाची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे.

मंदिरात स्वर्गमंडप आणि मुखमंडप असे भाग असून आयताकृती असलेले हे स्वर्गमंडप पाहायला अगदी वेगळेच वाटते. स्वर्गमंडपाचे छत अत्यंत बारकाईने आणि नाजूक कोरीव कामाने सजवलेले असून त्यावर अप्सरा, गंधर्व, किन्नर, यक्ष, विद्याधर तसेच देवांचे सेवक यांची आकर्षक व देखण्या शिल्पकलेची नक्षी कोरलेली आहेत. यासोबतच विविध प्राणी आणि पक्ष्यांचेही आकर्षक व जिवंत भासणारे चित्रण करण्यात आलेले असून, संपूर्ण शिल्पकलेत अप्रतिम कौशल्याची झलक दिसून येते.

त्याच मंडपात भगवान शिवांची उग्र आणि प्रभावशाली कालभैरवनाथ रूपातील भव्य मूर्ती उभी असून, ती अध्यात्मिक शक्ती आणि अप्रतिम शिल्पकलेचे दर्शन घडवते. श्री हरिहरेश्वर मंदिर हे केवळ पूजास्थळ नसून, एक पवित्र, ऐतिहासिक आणि कलात्मक असा अमूल्य ठेवा आहे. प्रत्येक भाविक, पर्यटक आणि वारसा जपणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात किमान एकदा तरी या मंदिराला भेट द्यावी, असा हा अद्वितीय अनुभव आहे.

श्री हरिहरेश्वर मंदिराच्या उत्खननात अजून एक बहुमुखी शिवलिंग हे एक असामान्य शिल्प. याचा आकार लिंगासारखा असून शिलेचा परिघ चार मिटर वजन साडेचार टन आहे.

नदीचा परिसर पाहून आम्ही पुढच्या दिशेने निघालो ते विजयपुरा (पूर्वीचे बिजापूर) येथे. मोबईल मध्ये मॅप लावल्याप्रमाणे वास्तूंना भेट देऊन त्यांची वास्तूकला, स्थापत्यशैली, इतिहासाचा संदर्भ घेत व अभ्यास करत आम्ही तेथील परिसर भटकत राहिलो. 

पुरातत्व वास्तु संग्रहालय 

सात कबर

तोरवी नरसिंह मंदिर

संगीत नारी महल

इब्राहीम रोजा

मलिक-ए-मैदान

गोल गुम्बज

महतर महल मस्जीद

जामा मस्जीद

बारा कमान

ऐन-उल-मुल्क कबर

शिवगिरी मंदिर

असर महल

गगन महल

सर्व पाहून आम्ही गाठले ऐहोळे. उशीर तर झाला होताच, त्यामुळे वाटेतच छान जेवून तेथील एक नवीनच झालेल्या होमस्टे मध्ये मुक्काम केला आणि प्रवासाचा सगळा शिण संपवला.