Monday, 16 June 2025

KARNATAKA UNPLANNED | सिरीमने फॉल्स - Sirimane Falls| श्रृंगेरी शारदा पीठ – Sharada Peetham, Sringeri | जोगीगुंडी धबधबा - Jogigundi Falls |

    अचानक आमचा अगुंबे रेन फॉरेस्टचा प्रवास ठरला. ना कुठली योजना, ना कुठली पूर्वतयारी… फक्त गाडी काढली आणि निघालो एका अनोळखी, निसर्गरम्य प्रवासासाठी!

    प्रवासाची सुरुवात मुंबईपासून झाली. बॅग्स, कॅमेरा, ड्रोन बस्स.. गाडीत पेट्रोल भरवलं आणि सुरू झाला रात्रीचा प्रवास कोल्हापूरकडे. कोल्हापूरला एक मुक्काम झाला. दुस-या दिवशी सकाळी पुढच्या टप्प्यासाठी सज्ज झालो. कोल्हापूरहून आम्ही शिमोगा जिल्ह्यातील तीर्थहल्ली या छोट्याश्या पण खूपच निसर्गरम्य गावाकडे निघालो. रस्त्यात डोंगरद-या, हिरवीगार झाडं, आणि सतत बदलणारं हवामान – या सगळ्यांनी प्रवास खूपच सुंदर केला. संध्याकाळपर्यंत आम्ही तीर्थहल्लीला पोहोचलो आणि एक घरगुती छोट्याश्या होमस्टे मध्ये राहिलो. उशीर झालेला आणि थकलो होतो, म्हणून रात्री शांत झोप घेतली.

    दुस-या दिवशी सकाळीच आम्ही तयार झालो आणि निघालो जे मिळेल ते पहायला. आम्ही पोहोचलो सिरीमने फॉल्सला (Sirimane Falls) - कर्नाटकमधील एक सुंदर धबधबा जो पश्चिम घाटाच्या हिरव्यागार परिसरात वसलेला आहे. सिरीमने फॉल्सचा उंची अंदाजे ४० फूट आहे. हा परिसर दाट पानझडपणाच्या जंगलांनी वेढलेला असून, परिसर अतिशय शांत आणि निसर्गातलं सौंदर्य वेगळंच अनुभवायला मिळतं. येथे पाय-या उपलब्ध आहे ज्यामुळे फॉल्सच्या कडे सहज पोहोचता येतो. प्रवेश शुल्क भरून आपण इथे येऊ शकतो. पावसाळ्यात इथले सौन्दर्य खुलून येते. पर्यटक इथे भिजण्याचा आस्वाद घेतात.

    त्या नंतर काही तासांच्या प्रवासानंतर आम्ही श्रृंगेरी या पवित्र स्थळी पोहोचलो. श्रृंगेरी शारदा पीठाची स्थापना आदि शंकराचार्यांनी इ.स. ८व्या शतकात केली. ही भारतातील चार शंकराचार्य पीठांपैकी एक आहे. आदि शंकराचार्यांनी ज्ञान, भक्ती आणि अध्यात्म या तिन्ही गोष्टींची पायाभरणी याच स्थळावर केली. येथे देवी शारदा म्हणजेच ज्ञानदेवीचे भव्य मंदिर आहे. श्रृंगेरी पीठ हे ज्ञान आणि धर्मशास्त्राचं केंद्र मानलं जातं. येथे अजूनही वेदशाळा चालतात आणि शंकराचार्य यांच्या परंपरेतील गुरुजन वेदाध्ययन करवतात. प्रत्येक हिंदूने आयुष्यात एकदा तरी इथे यावं, असं मानलं जातं. श्रृंगेरी हे स्थळ तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले असून अत्यंत निसर्गरम्य आहे. शांतता, स्वच्छता आणि आध्यात्मिक वातावरण यामुळे येथे गेल्यावर मन शांत होते. झाडांखाली ध्यानधारणा करणारे साधू, गाभाऱ्याजवळ बसलेले भक्त, आणि मंद वार्‍यासह ऐकू येणारे मंत्रोच्चार – हे सगळं खूपच भारावून टाकणारं होतं. मंदिराची वास्तुशैली द्रविड शैलीतील आहे. कोरीव काम, सुंदर खांब, आणि भव्य सभामंडप लक्ष वेधून घेतात. गाभाऱ्यात असलेली शारदा माताजीची मूर्ती तेजस्वी वाटते. मंदिरासमोरील तलाव, कमानी आणि दीपस्तंभ फारच सुंदर आहेत. दुपारी आम्ही मंदिराच्या प्रसादालयात गेलो. तिथे आम्हाला साध्या पण चविष्ट अन्नाचा प्रसाद मिळाला. सुरुवातीला भात-रस्सम, भात-सांबार आणि त्या नंतर भात-टाक असे एकंदर कोर्स होता. संपूर्ण वातावरण शांत व भक्तिभावाने भरलेलं होतं. पंगतीत बसून जेवल्यावर मनाला समाधान वाटलं. नंतर आस्थेने आणि समाधानाने आम्ही तिथून परतीच्या प्रवासाला निघालो, मनात शांती आणि श्रद्धा घेऊन.

    आम्ही मध्येच एका घाटात होतो जिथे सन सेट पॉइंट आहे. धुक्यातला रस्ता आणि ते वळण. पाऊस, वारा आणि गूढ वातावरण. आजचा दिवस संपला तो दुसऱ्या दिवशीच्या आशेवर.... 

    सकाळी लवकर उठून, आवरून सगळे निघालो ते जोगीगुंडी धबधबा पाहायला. धबधब्याकडे जाणारी छोटी वाट ही जंगलातूनच जाते. ही वाट थोडी अरुंद आणि हिरवळीत लपलेली असली तरी अगदी रोमांचक वाटणारी आहे. पक्ष्यांचा किलबिलाट, झाडांमधून येणारी मोकळी वाऱ्याची थंड झुळूक आणि मधूनच दिसणारा धबधब्याचा हलकासा आवाज वातावरणात एक वेगळंच जादू निर्माण करत होता. शिवाय पावसाने तर आम्हाला भिजवून टाकले होतेच.

    वाट संपली की काही पायऱ्या लागतात, ज्या आपल्याला धबधब्याच्या अगदी जवळ घेऊन जातात. जसजसं पुढे जात होतो, तसतसं कोसळणारं पाणी ऐकू येऊ लागलं आणि अचानक समोर आलं एक अप्रतिम दृश्य – जोगीगुंडी धबधबा!

    धबधबा दिसायला खूपच सुंदर होता, पण त्याच्यात एक प्रकारचा रुद्रपणा देखील होता – जोरात कोसळणारं पाणी, त्यातून उडणारे थेंब आणि आजूबाजूचं निसर्गरम्य वातावरण... हे दृश्य क्षणभर थक्क करणारं होतं. पाण्यात उतरायला जागा नव्हती आणि प्रवाहही खूप जोरात होता, त्यामुळे फक्त बाहेरूनच बघणं शक्य होतं. पण कोसळणारं पाणी बघण्याचा आणि त्याचा आवाज ऐकण्याचा अनुभव इतका जबरदस्त होता की, पाण्यात न उतरता देखील समाधान वाटलं.

    त्यानंतर भुकेची जाणीव झाली. त्यापूर्वी वाटेत असणाऱ्या मालगुडी डेज मधील घराजवळ थांबलो. मालगुडी डेज ही आर. के. नारायण यांच्या कथांवर आधारित एक दूरदर्शन मालिका आहे, ज्यामध्ये अनेक रम्य व कल्पनाशक्तीने भारलेली गावे, पात्रं आणि प्रसंग आहेत. तो बंगला अगदी जुन्या काळचा होता – मोठ्या खिडक्या, लाकडी दरवाजे. मजा आली. अगुंबेचं वातावरण अनेकांना ध्यानधारणेसाठी आणि नैसर्गिक शांतीसाठी अनुकूल वाटतं. " मालगुडी डेज " मालिकेचे लेखक आर. के. नारायण यांनी याच परिसरातून प्रेरणा घेतली होती. 
    अगुंबेच्या निसर्गात एक अशी अलौकिक शांती आणि गूढता आहे जी प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय अनुभवता येत नाही.......

No comments:

Post a Comment