Thursday, 19 June 2025

अजिंठा लेणी, संभाजीनगर (यूनेस्को स्थळ) | Ajintha Caves, Sambhajinagar | (UNESCO heritage)


    महाराष्ट्र राज्यातील प्राचीन अजिंठा आणि वेरूळ लेणी या सातवाहन, वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट या राजवटीच्या काळात निर्माण झाल्या आहेत. या लेण्यांमधील उत्कृष्ट स्थापत्यकला, शिल्पकला आणि चित्रकलेमुळे त्या जगप्रसिद्ध ठरल्या आहेत. युनेस्कोने अजिंठा लेण्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केला आहे. त्यामुळे कदाचित आम्हाला पण ओढ लागली होती असा वारसास्थळ पाहण्याची. म्हणून नेहमीप्रमाणे वाट धरली ते थेट अजिंठा... 

    सकाळचे साडेदहा वाजले होते. सूर्य माथ्यावर यायला लागला असला तरी डोंगरांच्या सावलीमुळे थोडं थंड वाटत होतं. पार्किंगमध्ये गाडी लावून आम्ही शटल बसमध्ये बसलो. ती बस आपल्याला डोंगरपायथ्याला आणून सोडते. एंट्री गेटवर पोचल्यावर, आम्ही तिकीट खिडकीवर गेलो. तिथं लोकांची थोडी गर्दी होती, पण सुरळीत रांगेत तिकीट मिळालं. हातात तिकीट घेतल्यावर जणू एखाद्या ऐतिहासिक काळाच्या दरवाजातून आपण आत शिरणार आहोत, असं वाटलं. तेथून पुढे चालत किंवा शिड्या चढत आपण अजिंठा लेण्यांच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो.

    संभाजीनगर शहरापासून सुमारे 101 कि.मी. अंतरावर दगडी कोरीव काम केलेल्या, सुंदर विहंगम अजिंठा लेणी एका विशाल दरीच्या मार्गावर घोड्याच्या नालच्या आकारात कोरलेली आहेत. यातील लेणी चित्रे, शिल्पकला या बौद्ध वास्तुकलेच्या काही उत्कृष्ट उदाहरणांपैकी एक आहेत. या लेण्यांमध्ये बुद्धांना समर्पित एक उपासनागृह किंवा चैत्यगृह आहे, एक विहार किंवा बौद्ध मठ आहे, जिथे बौद्ध भिक्खू ध्यान आणि बौद्ध शिकवणींचा अभ्यास करत असत.

    या लेण्यांच्या भिंतींवर आणि आतील छतावर बुद्धाच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना आणि बौद्ध धर्माच्या दैवी प्रतिमा कोरल्या आहेत. इतर सुंदर चित्रांमध्ये जातक कथांमधील विविध कथा, बोधिसत्वाच्या मागील जन्मांचे चित्रण केले आहे ज्यांनी बुद्ध बनण्यासाठी दीक्षा घेतली. बौद्ध धर्मातील हीनयान आणि महायान अशा दोन संप्रदायांचे तत्त्वज्ञान अजिंठा लेण्यात पाहायला मिळते.

    700 वर्षे व्यस्त राहिल्यानंतर अचानक अजिंठा लेणी विस्मृतीत गेली. या गुहा शतकाहून अधिक काळ काळाच्या अंधारात लपून राहिल्या, पण १८१६ मध्ये ब्रिटिश लष्कर अधिकारी जॉन स्मिथ शोध मोहिमेवर निघाले असता अचानक या लेण्यांपर्यंत पोहोचले.

    आमचा प्रवास पहाटे लवकर सुरू झाला. हिरवळीच्या कुशीतून जाणारी रस्त्यांची वाट, सभोवतालचा निसर्ग, आणि आल्हाददायक गारवा हे सगळं अगदी मनाला स्पर्शून जाणारं होतं. अजिंठ्याकडे जाताना डोंगरदऱ्यांतून वळणावळणाचे रस्ते लागतात, आणि जसजसे आपण जवळ जातो, तसतसं वातावरण एक वेगळीच शांतता देऊ लागतं. अजिंठा लेण्यांमध्ये पाय ठेवताच डोंगराच्या कुशीत कोरलेली ती अप्रतिम कलाकृती पाहून आपण थक्क होतो. लेण्यांमधील बुद्ध मूर्ती, भित्तीचित्रं, आणि शिल्पकाम हे इतकं सजीव वाटतं की जणू आपण त्या काळात जगत आहोत.

    अजिंठ्याचा परिसर अत्यंत रम्य आहे. समोर खोल दरी, आणि तिच्या तळाशी वाहणारी वाघूर नदी… बाजूला घनदाट झाडी आणि वरून वळण घेत घेत चाललेली लेण्यांची रांग… हे दृश्य डोळ्यांना समाधान देणारं आहे. तिथं उभं राहून क्षणभर डोळे मिटले की, इतिहासाचे ध्वनी मनात घुमायला लागतात. ह्या प्रवासात मन केवळ भूतकाळात रमून जातं असं नाही, तर आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो.

 

 

No comments:

Post a Comment