गिरीभ्रमण म्हणजे केवळ निसर्गसौंदर्याचा अनुभव नाही, तर ती एक ऐतिहासिक यात्रा आहे – काळाच्या साक्षीदारांशी, आपल्या स्वाभिमानाशी आणि बलिदानाच्या गाथांशी संवाद साधण्याची एक संधी. महाराष्ट्रातील अनेक गड आजही उभे आहेत – धीराने, अभिमानाने. त्यांनी केवळ परकीय सत्तेला झुंज दिली नाही, तर त्यांनी आपल्या अस्मितेचा व स्वातंत्र्याचा दरारा टिकवून ठेवला आहे. आज हे गड दुर्ग आपल्याला स्मरण करून देतात की स्वातंत्र्य सहज मिळालं नाही. या तटबंद्या आजही न बोलेता सांगतात – “आम्ही झुंजलो, आम्ही मरण पत्करलं, पण गुलामी स्वीकारली नाही.” हे ऐकण्यासाठी, अनुभवण्यासाठी, त्या मातीला स्पर्श करण्यासाठी – गडावर जायला हवं.
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले हे गड, केवळ संरक्षणासाठी बांधले गेले नव्हते, तर त्यातून एक संदेश गेला – "स्वराज्य हे आपले हक्काने मिळवायचे आहे." राजगड, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, रायगड – यांचा इतिहास तर झुंजारतेचा आणि दुर्दम्य इच्छाशक्तीचा इतिहास आहे.
गडावर जायचं म्हणजे चालण्याचा किंवा गिरीभ्रमणाचा अनुभव नव्हे फक्त – तो एक चालता इतिहास आहे. प्रत्येक पायरीवर, प्रत्येक तटबंदीवर, प्रत्येक बुरुजावर एक कथा आहे – कधी गनिमाच्या हल्ल्याची, तर कधी आपल्या वीरांच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची. सह्याद्रीचे गड-किल्ले फक्त दगडांनी घडलेले बुरुज नसून, ते आपल्या पूर्वजांच्या शौर्याचे, बलिदानाचे सजीव साक्षीदार आहेत. ज्या ठिकाणी आज आपण निवांत उभे राहून फोटो काढतो, तिथे एकेकाळी रणभेरी वाजत होती, तलवारी चमकत होत्या, आणि रक्ताचा वर्षाव होत होता. ऊर भरून येतो, डोळे ओलावतात – केवळ त्या बलिदानाच्या आठवणीने. शिवकालीन मावळे, शिपाई, सरदार – जे आपल्या कुटुंबाला मागे ठेवून गडाच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावत होते – त्यांची ही भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करताना या गडांना आपले आधार बनवले. आज जे स्वातंत्र्य आपण अनुभवतो, त्याचा पाया याच गडांवर घडलेला आहे. गिरिभ्रमंती ही या इतिहासाशी नाळ जुळवण्याची प्रक्रिया आहे. त्या कड्यांवरून चालताना वाटतं – "हीच ती जागा जिथे तलवारी झळकल्या, रणगर्जना ऐकू आल्या!"
गिरिभ्रमंती म्हणजे फक्त डोंगर चढणे, उतरून येणे नव्हे. ही एक अनोखी साधना आहे, आत्मशोधाची, इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्याची, आणि निसर्गाशी एकरूप होण्याची. डोंगरावर चालताना मनात विचारांची वावटळ असते, पावलांमध्ये दमछाक, पण त्याचबरोबर अंतर्मनात येतो एक शांतीचा स्पर्श – तोच गिरिभ्रमंतीचा खरा अर्थ. गिरिभ्रमंती ही आपल्या अस्तित्वाशी संवाद साधण्याची संधी असते. डोंगर चढताना आपल्या मर्यादा, त्रास, मनाचा संघर्ष आणि निसर्गाची दाट ऊब – हे सगळं एका वेगळ्याच पातळीवर अनुभवायला मिळतं. शहराच्या गजबजाटातून दूर जाऊन, निसर्गाच्या कुशीत मन रमवत, आपण स्वतःशी भेटतो. त्यात एक अध्यात्मिक समाधान असतं.
पावसाळ्याची चाहूल लागताच सह्याद्री डोंगररांगा पुन्हा एकदा नटूनथटून उभ्या राहतात. धुक्याची चादर, धबधब्यांची गडगडाट, हिरवीगार मखमल आणि याच हिरवळीवर उभे असलेले ऐतिहासिक किल्ले. सह्याद्रीच्या कडे-कपारी, हिरवाईने नटलेली डोंगररांग, वा-याची झुळूक, ढगांचे खेळ, आणि पावसाच्या सरी – हे सगळं मनात खोलवर रेंगाळतं. त्यातली भव्यता शब्दात सांगता येत नाही. सह्याद्री म्हणजे फक्त डोंगर नव्हे, तो एक गुरु आहे – धैर्य शिकवणारा, सखा आहे – शांततेची सोबत करणारा, आणि मित्र आहे – मन मोकळं करणारा. गिरिभ्रमंती करताना येणारे अनुभव अनेक असतात – चढ-उतार, चुकलेले वाटा, थकवा, मित्रांची साथ, निसर्गाशी लढा आणि जिंकलेली मनःशक्ती. यातून समजते की माणूस कितीही मोठा झाला, तरी निसर्गासमोर तो "खुजा" आहे. सह्याद्री आपल्याला जमिनीवर आणतो. अहंकाराला ठेच देतो. जीवनातली साधेपणा आणि सत्व शिकवतो.
डोंगरावर सूर्यास्त पाहताना, ढगांतून उगमलेली इंद्रधनुष्य, एखादा गडावरील ऐतिहासिक दरवाजा, किल्ल्याच्या भग्न भिंतीवर बसून घेतलेली एक खोल श्वास – हे क्षण फक्त अनुभवायचेच असतात. अशा क्षणी, मन स्तब्ध होतं. हेच क्षण आपल्याला पुन्हा-पुन्हा गिरिभ्रमंतीकडे ओढतात. गिरिभ्रमंती तुम्हाला शिस्त शिकवते, संयम शिकवते, आणि कधी न बोलता तुम्हाला जगण्याचं खरं तत्त्व शिकवते. कधीकधी हरवलेले वाट शोधताना आपण आपलीच हरवलेली जाणीव पुन्हा सापडवतो.
गिरिभ्रमंती म्हणजे केवळ डोंगरचढाई नव्हे, ती म्हणजे आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाशी जोडणारी, निसर्गाशी एकरूप करणारी, आणि स्वतःची ओळख करून देणारी एक अद्वितीय आध्यात्मिक यात्रा आहे. गड-गडकोट, सह्याद्रीचे पठार, कड्या-कपा-या हे आपले संस्कृतिक रक्षणकर्ते आहेत. त्यांनीच आपल्याला दिलंय आजचं स्वातंत्र्य, आणि त्यांनीच आपल्याला दिलंय स्वतःशी जोडलेलं आयुष्य. ही एक रोमांचक मोहीम आहेच, पण त्याहीपलीकडे ती एक जीवनशिक्षण आहे. इतिहास आपल्याला प्रेरणा देतो, निसर्ग आपल्याला नम्रता शिकवतो, आणि या प्रवासात आपण स्वतःशी मैत्री करतो. म्हणूनच, डोंगर चढणं म्हणजे डोंगर जिंकणं नाही – तर स्वतःवरचं नियंत्रण मिळवणं असतं. हे गड हे त्या बलिदानाचे चिरंतन स्मारक आहेत. म्हणूनच गडांवर चढताना फक्त एक पर्यटक म्हणून नव्हे, तर एक कृतज्ञ इतिहासप्रेमी म्हणून जावं. त्या गडांना नतमस्तक व्हावं, कारण ते आपल्यासाठी उभे आहेत – अनेक झुंजींची साक्ष देत.
संध्याकाळी सूर्य मावळतीकडे झुकू लागला तसं परतीच्या वाटेला लागतो आणि पायथ्याला परतल्यावर मनात एकच विचार येत रहातो – हा गड केवळ दगडधोंड्यांनी बनलेला नाही, तर त्यात शिवरायांच्या स्वप्नांची, त्यागाची, आणि पराक्रमाची किनार आहे.
"गडावर चढताना मन डोंगराइतकं विशाल होतं, आणि उतरताना आत्मा एका नव्या उंचीवर पोहोचलेला असतो."






No comments:
Post a Comment