Tuesday, 10 June 2025

मायरेस्टिका दलदल – एक जैववैविध्यपूर्ण नैसर्गिक खजिना | Myristica Swamp - The Primitive Swamp Forests Of The Western Ghats

मायरेस्टिका दलदल (Myristica Swamp)-एक जैववैविध्यपूर्ण नैसर्गिक खजिना  :

आम्ही नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा परिसरात पक्षी निरीक्षणासाठी गेलो होतो. तिथे स्थानिक मार्गदर्शकांशी बोलताना "मायरेस्टिका दलदल" याबद्दल ऐकायला मिळालं. त्याबद्दल ऐकूनच इतकी उत्सुकता निर्माण झाली की आम्ही लगेच तिकडे निघालो!

मायरिस्टिका स्वॅम्प्स (Myristica Swamp) ही भारतातील अतिदुर्मिळ प्राचीन परिसंस्था आहे ती झाडांनी आच्छादलेली ओलसर जमीन असून प्रामुख्याने वेस्टर्न घाट्समधील सदाहरित जंगलांच्या आतल्या छोट्या खाचखळग्यात आढळते. असा हा गोड्या पाण्याचा, दलदलीचा दाट हिरव्या जंगलाने झाकलेला अधिवास. अंधाऱ्या, गूढ वातावरणातील हे बुंध्यांचे वृक्ष सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत उंचच उंच वाढत जातात. बारमाही वाहणाऱ्या पाण्यात टिकून राहाण्यासाठी त्यांच्या बुंध्यातूनच असंख्य मुळांचे पाय फुटतात तिरके वाढून जमिनीत घुसतात आणि झाडाला आधार देतात. सतत पाण्याखाली असणाऱ्या इथल्या जमिनीतील ऑक्सिजनच्या अभावामुळे मुळांमध्ये घडून आलेलं हे अनुकूलन. झाडांची मुळे जमिनीच्या बाहेर दिसणारी असतात (pneumatophores), जे दलदलीत श्वास घेण्यासाठी उपयोगी असतात. भारतातील पश्चिम घाटात, विशेषतः कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यात मायरिस्टिका स्वॅम्प्स आढळतात. याशिवाय, अंदमान आणि निकोबार बेटांमध्येही यांचा एक छोटासा भाग अस्तित्वात आहे


  • या जंगलांना Primitive (आद्य) स्वॅम्प फॉरेस्ट्स म्हटले जाते, कारण या प्रकारची जंगले प्राचीन भूवैज्ञानिक काळापासून अस्तित्वात आहेत.
  • हे दलदलयुक्त जंगल संपूर्ण वर्षभर पाण्याखाली असते.
  • दलदलीचे स्वरूप असल्याने पावसाचे पाणी साठवून ठेवतात भूजलपातळी कायम ठेवतात.
  • या सदाहरित झाडांमुळे मोठ्या प्रमाणावर कार्बन शोषला जातो.
  • स्थानिक सूक्ष्म हवामान नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
  • येथे अनेक दुर्मिळ कीटक, उभयचर, जलचर, सरपटणारे प्राणी, आणि विशेष प्रकारचे पक्षी आढळतात.
  • पक्षी निरीक्षकांसाठी ही जागा म्हणजे एक स्वर्गच!

तिथे गेल्यावर झाडांची घनदाट रचना, गडद सावली, पाण्याखालची जमीन, आणि पक्ष्यांचा मंजुळ आवाजहे सगळं अनुभवलं. या अनोख्या जंगल रचनेनं मन भारावून गेलं. आपण किती नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध आहोत याचा खरंच अभिमान वाटतो.

त्यामुळे मायरिस्टिका स्वॅम्प्स ही केवळ ओलसर दलदल नसून ती जैवविविधतेची खाण, पाणलोट क्षेत्रांचे रक्षण करणारी परिसंस्था आणि प्राचीन निसर्गाचा एक जिवंत वारसा आहे.

धोक्ये :

  • अतिक्रमण शेतीसाठी जमीन वापर
  • जंगलतोड
  • हवामान बदलामुळे वाढलेला दुष्काळ किंवा पूर
  • स्थानिक पातळीवर जागरूकतेचा अभाव

 

अभ्यास संरक्षण :

  • भारतातील पर्यावरणशास्त्रज्ञांनी या Myristica Swamps वर सखोल संशोधन केले असून, यांचे Western Ghats Biosphere Reserve मध्ये मोठे महत्व मानले जाते.
  • या दलदलीचे संरक्षण झाल्यास वेस्टर्न घाटातील परिसंस्थेला अधिक बळ मिळेल.
  • पर्यावरण शिक्षण, स्थानिक सहभाग, आणि पर्यावरणपर पर्यटन यामुळे यांचे जतन शक्य आहे.

 

अशी ठिकाणं ही भविष्यासाठी संरक्षित ठेवणं अत्यावश्यक आहे.

---


देवघळी बीच कशेळी | Devghali Beach, Kasheli

 

    आम्ही बर्‍याच दिवसांपासून मनात ठेऊन ठेवलेली देवघळीची ट्रिप अखेर ठरवलीच. रत्नागिरीचा दोन दिवसांचा प्लॅन ठरला, आणि चर्चेअंती तिकीटंही बुक झाली. वाट पाहिलेली संधी मिळाली होतीआता समुद्राचा गाज निवांत ऐकत वेळ घालवायचा होता, नुसते येऊन निघायचे नव्हते.

    आम्ही सकाळी लवकर निघालो, आणि रत्नागिरीला पोहचल्यावर तिथेच आमची पीकअपसाठी गाडी आली होती. थोडं फ्रेश झालो आणि पुढे निघालो देवघळीच्या दिशेनेजिथे एक शांत, साधीशी पण मनाला भिडणारी छोटी जागा आहे. तिथे एक दादा आणि वाहिनी, राहायची आणि जेवायची सोय करून देतात. त्यांच्या जागेची आत्मीयता जाणवतोघरगुती जेवण आणि अगदी जवळ टाकलेले टेंट्ससगळंच अगदी आपल्यासारखं वाटणारं.

    दिवस कलायला लागला तसं सूर्यास्ताच्या साक्षीने आम्ही समुद्रकिनारी बसलो. त्या क्षणी समुद्राच्या लाटा, मऊ वाळू आणि आकाशातले रंग यांचं एक सुंदर संमेलन झालं होतं. सूर्य जसा हळूहळू क्षितिजाच्या मागे जात होता, तसं तिथलं प्रत्येक क्षण अंगावर रोमांच आणणारा होता.

    रात्री टेंटमध्ये झोपताना दूरवरून येणारा समुद्राचा गाज, आणि थोडं दूरवरच्या नारळांच्या झाडांचा सळसळणारा आवाजयांची संगत काहीशी स्वप्नवत वाटली. रात्रीचं आभाळसुद्धा इथे वेगळंच भासतंअंधाराचा कुशीत विसावलेलं, पण चांदण्यांनी झगमगलेलं.

    दुसऱ्या दिवशी सकाळी समुद्रकिनारी फेरफटका, मग घरगुती नाष्टा आणि निवांत वेळमोबाईल, गोंगाट, घाई यापासून दूर.

    हे दोन दिवस कसे निघून गेले, समजलंही नाही. आणि मग, वेळ झाला तो परतीचाजड अंत:करणाने, पण सुंदर आठवणी घेऊन आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. देवघळी आमच्या आठवणीत घर करून गेलं. तो गाज, तो सूर्यास्त, ती शांतताहे सगळं कायमचं मनात कोरलं गेलं.


फुगतल ट्रेक, झंस्कर, लडाख PHUKTHAR MONESTRY/ Phuktal, Zanskar

    आम्ही चार मैत्रिणी निघलो होतो झंस्कर फिरण्यासाठी. जवळपास १०-१२ दिवसांचा अवधी काढला होता. मुंबई ते लेह अशी फ्लाइट घेऊन आम्ही लेह पासून हा प्रवास सुरू केला आणि लेह मध्ये संपवला. त्यात बरीच चांगली ठिकाणे पहिली आणि त्यात लक्षात रहाणारा असा एक ट्रेक आम्ही केला.

    फुगतल किंवा फुकताल मठ ट्रेक हे झंस्कर खोर्‍यातील एक विलक्षण अनुभव आहे. हा मठ लडाखच्या करगिल जिल्ह्यात, झंस्कर उपप्रदेशात वसलेला आहे. हा ट्रेक म्हणजे निसर्गाच्या आणि अध्यात्माच्या संगमाचं जणू एक दर्शन आहे.

    आमचा प्रवास सुरू झाला पादुम गावातून. तिथून २ ते ३ तासाचा ट्रेक आहे, साधारण सोपा पण थोडा चढ-उतार असलेला. रस्ता संथ वाहणाऱ्या लुंगनक नदीच्या (Lungnak River) काठाने जातो. ही नदी निळ्या आकाशाच्या प्रतिबिंबाने चमचमणारी, थंड आणि पारदर्शक आहे. निसर्ग आणि वातावरण ट्रेक दरम्यान आजूबाजूला फक्त धोंडाळा, आकाशी नीळसर रंग, शुद्ध हवा, आणि शांतता. वाऱ्याचा आवाज आणि पायाखालचा खडा एवढंच ऐकू येतं. हवेतील गारवा आणि उंचीमुळे थोडं दमणं होऊ शकतं, पण दृश्य असं की "वाह!" म्हणावं.

    फुगतल मठ (Phuktal Monastery) हा १२व्या शतकात स्थापन झालेला असून गेलुग्पा परंपरेचा आहे. मठ खडकात कोरलेला असून एक मोठी गुहा, जी प्राचीन काळी योगी आणि भिक्षूंचं ध्यानस्थळ होती, तिच्याभोवतीच मठ उभा आहे. असं मानलं जातं की संपूर्ण मठ गुहेतूनच विकसित झाला. या मठाचं वैशिष्ट्य तो एका उंच टेकडीवर आहे आणि खालून बघताना जणू भिंतीतूनच बाहेर आलेला वाटतो. मठात अजूनही भिक्षू राहत असून, तिथे लहान मुलांचं शिक्षण, ध्यानधारणा आणि धार्मिक विधी चालतात.

राहण्याची सोय-

    फुगतल मठाजवळ एकच गेस्ट हाऊस किंवा मठातच छोटीशी वसती असते. फारशी सोय नाही, पण मठातील साधेपणा आणि भिक्षूंचं आतिथ्य हेच सगळ्यात मोठं स्वागत असतं.

    तुम्ही वरून जेव्हा मठाकडे पाहता, तेव्हा खाली वाहणारी नदी, आकाशाची निळाई, आणि डोंगरांनी वेढलेलं ते एकटं मठविस्मयचकित करणारं.

 

टिप: 

हा ट्रेक तुम्ही उन्हाळ्यात (मे ते सप्टेंबर) केला तर उत्तम. हिवाळ्यात बर्फामुळे मार्ग बंद होतो.


पाणखोल जुवा बेट – एक निसर्गरम्य जगत, सिंधुदुर्ग | PANKHOL JUVA, SINDHUDURG |


सिंधुदुर्ग जिल्हा हा आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी, समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि ऐतिहासिक किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात एक छोटं पण अत्यंत आश्चर्यकारक देखणं बेट आहे - पाणखोल जुवा बेट, एक वेगळे, निसर्गरम्य आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण. हे बेट अगदीच छोटं असून, साधारण ३० ते ३५ घरं इथे आहेत. पण या बेटाची खासियत म्हणजे इथल्या लोकांनी आपलं पारंपरिक आणि निसर्गसंपन्न जीवनशैली जपली आहे.

 घराबाहेर गाडी नाहीतर बोट आहे!

शहरात जसं प्रत्येकाच्या दारात एक गाडी दिसते, तसं या बेटावर प्रत्येकाच्या दारात एक छोटी बोट दिसते. पाण्यातून प्रवास करणं हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. ही बोटच त्यांची ओळख, त्यांचं वाहन आणि त्यांच्या जीवनाचं अविभाज्य अंग बनली आहे. सरकारने इतर संस्थांनी या बेटावर पूल बांधण्याचा प्रस्ताव मांडला होता, पण गावकऱ्यांनी ठाम नकार दिला. त्यांना बाहेरच्या दुनियेचा गोंगाट नको आहे. त्यांना हवा आहे तो शांत निसर्ग, स्वच्छता, आणि पारंपरिक आयुष्य. पूल बांधला गेला असता, बाहेरील वर्दळ वाढली असती आणि बेटाचा निसर्ग बिघडला असताहे ते चांगलं जाणून आहेत.

बेटावर शांतता, हिरवळ, माडाची झाडं, मासेमारीचं पारंपरिक ज्ञान, आणि सागरी खाद्यसंस्कृती पाहायला मिळते. जळाच्या कुशीत वसलेलं हे बेट म्हणजे निसर्गाशी एकरूप झालेलं जीवन. येथे समुद्र, मॅंग्रोव्ह (खारफुटी जंगल) आणि जैवविविधतेचा सुंदर संगम पाहायला मिळतो. खारफुटीच्या जंगलामुळे किनारी परिसंस्थेचे संरक्षण होते.

जुवा बेट हे नुसतंच एक पर्यटनस्थळ नाही, तर सांस्कृतिक आणि पर्यावरणीय भान असलेल्या लोकांचं उदाहरण आहे. इथे एक दिवस घालवणं म्हणजे आपल्या धावपळीच्या आयुष्यात एक गोड विराम घेणं होय, जिथं निसर्ग, माणूस आणि शांतता यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो.

पाणखोल जुवा बेट हे सिंधुदुर्गातील एक निसर्गसंपन्न रत्न आहे. समुद्र, खारफुटी, पक्षीजीवन आणि शांत वातावरण यांचा संगम अनुभवायचा असेल तर हे बेट नक्कीच भेट द्यावे. हे ठिकाण केवळ पर्यटनासाठीच नव्हे तर निसर्गसंवर्धनासाठी देखील महत्त्वाचे आहे.