Saturday, 4 April 2026

श्री संगमेश्वर देवस्थान, हत्तरसंग कुडल, सोलापूर | Shree Sangameshwar Devasthan, Hattarsang Kudal | विजयपुरा (पूर्वीचे बिजापुर) | Solapur-Bijapur Tour

इतिहास हा केवळ भूतकाळ नसतो, तो दगडांत कोरलेला श्वास असतोआणि त्या श्वासाचा मागोवा घेत आम्ही बॅकपॅकर मंडळी निघालो होतो दक्षिण भारताच्या मंदिर वैभवाच्या अद्भुत प्रवासालामहाराष्ट्र-सोलापूर ते कर्नाटकातील चालुक्य, राष्ट्रकूट आणि होयसाळा परंपरेतील अजरामर वास्तुकलेचा शोध घेणारी ही आमचीAncient Temple Tour.

२०/१०/२०२५ ते २४/१०/२०२५ अशी आमची पाच दिवसाची रम्य आणि सकारात्मक अशी आमची एकंदर यात्रा होती. १९/१०/२०२५ रोजी आम्ही मुंबई-सोलापूर असा ट्रेन ने प्रवास केला भल्या पहाटे पोहोचलो सोलापूर येथे. हॉटेल नक्षत्रला थोडा वेळ का असेना आम्ही झोपायची सोय केली. सकाळी फ्रेश झालो. आमची गाडी हॉटेलच्या दारात स्वागतासाठी उभी होतीच. मस्त गरमागरम नाश्ता केला आणि प्रवास सुरू झाला.

दिवस : २०/१०/२०२५

श्री संगमेश्वर देवस्थान, हत्तरसंग कुडल (Sangameshwar Devasthan, Hattarsang Kudal)

संगमेश्वर व श्री हरिहरेश्वर मंदिर – महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर

सकाळची थंड हवा, शांत वातावरण आणि रस्त्यावरची कमी वर्दळ — अशा वातावरणात आम्ही सोलापूरहून हत्तरसंग कुडाळकडे निघालो. शहर मागे पडत गेले आणि हळूहळू ग्रामीण भाग, शेती, आणि मोकळा निसर्ग दिसू लागला. प्रवास खूपच सुखद वाटत होता. हत्तरसंग कुडाळ हे ठिकाण विशेष आहे कारण येथे दोन नद्यांचा संगम होतो. भीमा आणि सीना या नद्यांचा संगम येथे पाहायला मिळतो. या संगमावरच चालुक्यकालीन मंदिर स्थापत्यशैली, अप्रतिम व अनोखे शिल्पसौंदर्य, अत्यंत दुर्मीळ बहुमुखी शिवलिंग, तसेच शैव व वैष्णव पंथांचे सुंदर एकत्रीकरण—अशी अनेक वैशिष्ट्ये लाभलेले संगमेश्वर व हरिहरेश्वराचे मंदिर आपणास इथे पाहावयास मिळते.

संगमेश्वर मंदिरातील शिलालेखावरून हे मंदिर साधारणत: इ.स. १०१८ मध्ये बांधण्यात आल्याचे कळते. हे त्रिकूट म्हणजे तीन गर्भगृहे असलेले मंदिर आहे. चालुक्यांनंतरच्या काळात या मंदिराचा बऱ्याच वेळा जीर्णोद्धार झाला असावा, असे ऐकण्यात येते. येथील प्रवेशद्वार काहीसे उंच असून त्याच्या पायरीवर शुभचिन्हे कोरलेली आहेत. सभामंडपात मध्यभागी असलेल्या चार स्तंभांच्या मधील जागेत एका चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. गर्भगृहात असलेली शिवपिंडी शाळुंका उंच असून महादेवाचा पितळी मुखवटा आहे.

संगमेश्वर मंदिराच्या प्रांगणातून काही पायऱ्या उतरल्यावर हरिहरेश्वर मंदिराच्या विस्तीर्ण आणि शांत प्रांगणात प्रवेश होतो. या मंदिराची रचना अत्यंत सुबक आणि पारंपरिक असून त्यात मुखमंडप, सभामंडप, स्वर्गमंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे प्रमुख भाग समाविष्ट आहेत. येथील मुखमंडप खुल्या स्वरूपाचा असून, त्याची रचना विशेष लक्षवेधी आहे. समोरील बाजूस चौकोनी स्तंभपादावर उभारलेले स्तंभ विविध भौमितिक आकारांनी सजलेले आहेत—चौकोन, षट्कोन, अष्टकोन आणि वर्तुळ यांचा सुंदर संगम या स्तंभांमध्ये पाहायला मिळतो, जो त्या काळातील शिल्पकलेची समृद्धता दर्शवतो. मुखमंडपात एकाच दगडात पाठपोट कोरलेल्या दोन वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती विशेष आकर्षण ठरतात. यापैकी एक मूर्ती महालक्ष्मीची असून दुसरी भैरवी किंवा कालिका देवीची आहे. या मूर्तींच्या रचनेतून आणि तपशीलातून त्या काळातील कलाकारांची कुशलता आणि धार्मिक श्रद्धा स्पष्टपणे जाणवते.

महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांपैकी एक असलेले श्री हरिहरेश्वर मंदिर हे कल्याणीच्या चालुक्यांच्या काळात, .. ११व्या शतकाच्या प्रारंभी (सन १०१८ च्या सुमारास) बांधण्यात आलेले आहे. हे क्षेत्र शिव विष्णूचे एकत्रित सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मंदिर मानले जाते. उत्खननानंतर मंदिराचा सध्याचा अवशेष भाग स्पष्टपणे दिसून येतो. मंदिराच्या बांधकामात कोणत्याही सिमेंट किंवा चुना यांसारख्या माध्यमांचा वापर केलेला नाहीहे त्याच्या प्राचीन वास्तुशास्त्राचे एक विलक्षण वैशिष्ट्य आहे. मंदिराचे प्रमुख विभाग म्हणजे मुखमंडप, अंतराळ, गर्भगृह आणि इतर वास्तुशिल्प घटक. शिवाय उत्खननादरम्यान बऱ्याच सुंदर मूर्ती मिळाल्या आहेत. छतावरील शिल्पकला तर अप्रतिमच.

इ.स. १९९५ पूर्वी पर्यन्त सदर मंदिर पूर्णपणे मातीखाली गाडलेले होते. प्रा. गजानन भिडे (दयानंद महाविद्यालय, सोलापूर) यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने उत्खनन करून या प्राचीन हरिहरेश्वर मंदिराचा शोध लावला आणि ते पुन्हा प्रकाशात आणले.

या मंदिराची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे दोन गाभारे आहेत. डाव्या गाभाऱ्यात शिवलिंग विराजमान आहे, तर उजव्या गाभाऱ्यात मुरलीधर श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती आहे. या दोन गाभाऱ्यांच्या मध्ये देवकोष्ठामध्ये श्री गणेशाची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे.

मंदिरात स्वर्गमंडप आणि मुखमंडप असे भाग असून आयताकृती असलेले हे स्वर्गमंडप पाहायला अगदी वेगळेच वाटते. स्वर्गमंडपाचे छत अत्यंत बारकाईने आणि नाजूक कोरीव कामाने सजवलेले असून त्यावर अप्सरा, गंधर्व, किन्नर, यक्ष, विद्याधर तसेच देवांचे सेवक यांची आकर्षक व देखण्या शिल्पकलेची नक्षी कोरलेली आहेत. यासोबतच विविध प्राणी आणि पक्ष्यांचेही आकर्षक व जिवंत भासणारे चित्रण करण्यात आलेले असून, संपूर्ण शिल्पकलेत अप्रतिम कौशल्याची झलक दिसून येते.

त्याच मंडपात भगवान शिवांची उग्र आणि प्रभावशाली कालभैरवनाथ रूपातील भव्य मूर्ती उभी असून, ती अध्यात्मिक शक्ती आणि अप्रतिम शिल्पकलेचे दर्शन घडवते. श्री हरिहरेश्वर मंदिर हे केवळ पूजास्थळ नसून, एक पवित्र, ऐतिहासिक आणि कलात्मक असा अमूल्य ठेवा आहे. प्रत्येक भाविक, पर्यटक आणि वारसा जपणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात किमान एकदा तरी या मंदिराला भेट द्यावी, असा हा अद्वितीय अनुभव आहे.

श्री हरिहरेश्वर मंदिराच्या उत्खननात अजून एक बहुमुखी शिवलिंग हे एक असामान्य शिल्प. याचा आकार लिंगासारखा असून शिलेचा परिघ चार मिटर वजन साडेचार टन आहे.

नदीचा परिसर पाहून आम्ही पुढच्या दिशेने निघालो ते विजयपुरा (पूर्वीचे बिजापूर) येथे. मोबईल मध्ये मॅप लावल्याप्रमाणे वास्तूंना भेट देऊन त्यांची वास्तूकला, स्थापत्यशैली, इतिहासाचा संदर्भ घेत व अभ्यास करत आम्ही तेथील परिसर भटकत राहिलो. 

पुरातत्व वास्तु संग्रहालय 

सात कबर

तोरवी नरसिंह मंदिर

संगीत नारी महल

इब्राहीम रोजा

मलिक-ए-मैदान

गोल गुम्बज

महतर महल मस्जीद

जामा मस्जीद

बारा कमान

ऐन-उल-मुल्क कबर

शिवगिरी मंदिर

असर महल

गगन महल

सर्व पाहून आम्ही गाठले ऐहोळे. उशीर तर झाला होताच, त्यामुळे वाटेतच छान जेवून तेथील एक नवीनच झालेल्या होमस्टे मध्ये मुक्काम केला आणि प्रवासाचा सगळा शिण संपवला. 

No comments:

Post a Comment