“केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत भाषण…” ही उक्ती केवळ शब्द नाही, तर आयुष्य समृद्ध करणारा अनुभव आहे. प्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नाही; तो म्हणजे संस्कृती, श्रद्धा, परंपरा आणि माणुसकी यांना जवळून अनुभवण्याचा मार्ग.
भटकंती माणसाला बाहेरच्या जगाशी जोडतेच, पण त्याचबरोबर स्वतःशीही भेट घडवते. मित्रांसोबतचा प्रवास आनंद देतो, कुटुंबासोबतचा प्रवास आठवणी देतो; पण सोलो भटकंती मात्र आपल्याला स्वतःच्या मनाशी संवाद साधायला शिकवते. अनोळखी रस्ते, अनोळखी माणसं आणि अचानक सापडणारे अनुभव – हीच सोलो प्रवासाची खरी जादू. असाच एक अनुभव घ्यायची संधी मिळाली ऑक्टोबर 11–12, 2025 रोजी. कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथे होणाऱ्या बिरोबा यात्रेची माहिती मिळाली आणि मनात एकच विचार आला – ही यात्रा अनुभवायचीच!
क्षणाचाही विलंब न करता बॅकपॅक तयार झाली आणि सुरू झाले माझे मिशन पट्टणकोडोली! कोल्हापूर – यात्रेची सुरुवात : मुंबई ते कोल्हापूर तात्काळ तिकीट काढून प्रवास सुरू झाला. पहाटे कोल्हापूरला पोहोचल्यावर सर्वप्रथम अंबाबाई अर्थात महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या मंदिरात दर्शन घेताना मनाला विलक्षण शांतता मिळाली.
दर्शनानंतर शहरभ्रमंती करताना कोल्हापूरच्या इतिहासाची आणि संस्कृतीची झलक अनुभवायला मिळाली. कोल्हापूर हे केवळ धार्मिकच नाही, तर ऐतिहासिक वारसा जपणारे शहर आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे हे शहर सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींचे केंद्र राहिले आहे. भटकंतीदरम्यान तेथील वास्तूसंग्रहालयालाही भेट दिली. तिथे सहजच एका कर्मचाऱ्याने विचारले, “एकट्याच फिरताय का?”, पट्टणकोडोली यात्रेसाठी आलेय असे सांगताच तो खुशीत आला आणि म्हणाला की आपाची वाडी येथे हलसिद्धनाथ यात्रा सुरू आहे.
अनपेक्षित वळण – हलसिद्धनाथ यात्रा नाथ संप्रदायातील हलसिद्धनाथ हे स्थानिक भक्तांसाठी अत्यंत पूजनीय संत मानले जातात. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागात त्यांची मोठी भक्ती आहे. त्याने सांगितले की त्या यात्रेतही हळद-भंडाऱ्याची मोठी परंपरा आहे आणि हजारो भाविक तिथे जमतात. शिवाय शासनाने यात्रेकरूंकरिता अतिरिक्त बस सेवा सुरू केल्याचेही कळले. ही माहिती मिळताच लगेच ठरले – ही यात्रा देखील अनुभवायचीच! संध्याकाळी यात्रेकरू निवासात मुक्काम केला आणि सकाळी कोल्हापूर बस स्थानकातून पुढचा प्रवास सुरू झाला.
एस.टी. प्रवास – छोटा पण संस्मरणीय - कोल्हापूर ते कागल असा साधारण अर्धा-पाऊण तास एस.टी. प्रवास. त्यानंतर कागल बस स्थानकातून अप्पाची वाडी असा आणखी अर्धा तासाचा प्रवास. हा प्रवास करताना आपण जणू महाराष्ट्र-कर्नाटक सीमेकडे पोहोचतो. ग्रामीण भागातील हिरवळ, लहान गावे, आणि रस्त्यावर दिसणारी यात्रेकरूंची लगबग – सगळंच वेगळं वाटत होतं. गंमत म्हणजे ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत अर्धे तिकीट! त्यामुळे हा तुकड्या-तुकड्यांचा प्रवास केवळ १७–२० रुपयांत होत गेला. कधी नव्हे ते शासनाबद्दल मनापासून कौतुक वाटले.
हलसिद्धनाथ यात्रेचे अद्भुत वातावरण यात्रेच्या ठिकाणी पोहोचल्यावर सर्वत्र एक वेगळेच दृश्य दिसले. हवेत दरवळणारा हळदीचा सुगंध, पिवळसर रंगाची उधळण, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तांची गर्दी – जणू संपूर्ण परिसर हळदीच्या रंगात न्हाऊन निघाला होता. पायाखाली, कपड्यांवर, हवेत – सगळीकडे हळदच हळद. त्या वातावरणात नकळत हात जोडले गेले. श्रद्धा आणि परंपरेची ऊर्जा जणू त्या ठिकाणी जाणवत होती.
पट्टणकोडोली – बिरोबा यात्रेचा अनुभव माघारी येऊन पुन्हा यात्रेकरू निवासात मुक्काम केला आणि भल्या पहाटे पट्टणकोडोलीकडे प्रस्थान केले. वेळेत पोहोचल्यावर तिथेही तितकंच उत्साही वातावरण अनुभवायला मिळाले. ढोलपथकांचा गजर, पारंपरिक वाद्यांचे सूर, हळद-भंडाऱ्याने नटलेला परिसर आणि “जय बिरोबा”चा जयघोष – यात मन हरवून गेले. बिरोबा देव हे धनगर समाजाचे आराध्य दैवत मानले जातात. यात्रेदरम्यान पारंपरिक हेडाम नृत्य, लोकगीते आणि भाकणूक या गोष्टींचे विशेष महत्त्व असते. जागोजागी छोटे पथक कोंडळी करून लोकगीतांचा आस्वाद देत होते. काही ठिकाणी पारंपरिक नृत्य सादर होत होते, तर काही ठिकाणी भक्तिभावाने लोक देवाचे गजर करत होते. भाकणूकही होऊन गेलेली होती आणि त्याचे पडसाद सर्वत्र जाणवत होते. भक्तांच्या चेहऱ्यावर समाधान आणि श्रद्धेचा प्रकाश दिसत होता. त्या क्षणी मन प्रसन्न, भारलेले आणि मोकळे झाले.
निष्कर्ष – सोलो भटकंतीचे खरे सौंदर्य या यात्रेने मला पुन्हा एकदा एक गोष्ट जाणवून दिली – सोलो भटकंती म्हणजे फक्त प्रवास नाही, तर स्वतःला शोधण्याचा मार्ग आहे. अनोळखी रस्ते आपल्याला नवीन अनुभव देतात, अनोळखी माणसं आयुष्यभर लक्षात राहतील अशा गोष्टी सांगून जातात, आणि कधी कधी एखाद्या अनपेक्षित वळणावर आपल्याला असा अनुभव मिळतो जो नियोजनात कधीच नसतो.
पट्टणकोडोली आणि हलसिद्धनाथ यात्रेने श्रद्धा, परंपरा आणि लोकसंस्कृती यांचा एक अद्भुत संगम अनुभवायला दिला. त्या अविस्मरणीय आठवणी मनात साठवत परतीचा प्रवास सुरू झाला… मन मात्र अजूनही त्या हळदीच्या सुगंधात, ढोलांच्या गजरात आणि “जय बिरोबा”च्या जयघोषात रमलेले होते. आणि मनात एकच विचार पुन्हा उमटला – भटकंती कधीच संपत नाही… ती फक्त पुढच्या प्रवासाची हाक देत राहते.
.jpeg)
.jpeg)

No comments:
Post a Comment