Wednesday, 7 January 2026

ताडोबा-अंधारी व्याघ्र राखीव (TATR) - २०२६ ची एक परिपूर्ण वन्य सुरुवात

 


जानेवारी २०२६नवीन वर्षाची सुरुवात गोंगाट, गर्दी किंवा शहरातील जल्लोषात नाही, तर निसर्गाच्या कुशीत करायचं ठरवलं. त्यामुळेच नवीन वर्षाचं स्वागत थेट जंगलाच्या हृदयात ताडोबा-अंधारी व्याघ्र राखीव येथे केलं. हा निर्णय किती योग्य होता, हे ताडोबात पाऊल टाकताच लक्षात आलं.

ताडोबा-अंधारी व्याघ्र राखीव क्षेत्र म्हणजे निसर्गाच्या कुशीत घेऊन जाणारा एक अविस्मरणीय अनुभव. पहाटेची वेळ, आकाशात अजूनही अंधुक प्रकाश, आणि जंगलावर पसरलेले हलकेसे धुके - या वातावरणात सुरू होणारी ताडोबा सफारी मनाला शांतता देऊन गेली. सफारीसाठी गाडी जंगलात शिरते तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे, बांबूंची दाटी, आणि हिरवळ नजरेला भरते. धुक्याच्या पडद्याआडून हळूहळू दिसणारा जंगलाचा प्रत्येक रंग वेगळाच भास देतो. त्या शांततेत पक्ष्यांचे किलबिलाट, कुठेतरी दुरून ऐकू येणारा मोराचा आवाज, आणि पानांची सळसळ - हे सगळे मिळून पहाटेची सफारी खास बनवतात. थोड्याच वेळात वन्यजीवनाची ओळख सुरू होते. रस्त्यावरून सावधपणे चालणारे हरणांचे कळप, झाडांच्या सावलीत फिरणारे रानडुक्कर, तर कधी अचानक समोरून उडणारे रंगीबेरंगी पक्षी मन वेधून घेतात. तलावाजवळ पाण्यावर उमटणारे सूर्यकिरण, आणि आजूबाजूचा निसर्ग एक सुंदर चित्र तयार करतो.

ताडोबा म्हटले की वाघाची आठवण येते. वाघ दिसो वा दिसो, पण त्याची उपस्थिती प्रत्येक वळणावर जाणवते. पायांचे ठसे, जंगलातील शांत हालचाल, आणि मार्गदर्शकांकडून मिळणारी माहिती सफारीला अधिक रंजक बनवते. मार्गदर्शक चालक जंगलाचे नियम पाळत, प्रत्येक प्राण्याचा आदर राखत सफारी पूर्ण करतात. ही सफारी केवळ प्राणी पाहण्यापुरती मर्यादित नसते; ती निसर्गाशी जोडणारी एक अनुभूती असते. धुक्यात न्हालेली पहाट, जंगलाची शुद्ध हवा, आणि निसर्गाचा शांत संवाद मनाला नव्याने ताजेतवाने करतो. ताडोबा सफारी म्हणजे गोंगाटापासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेला एक सुंदर क्षण आहे.

या प्रवासातील सर्वात खास क्षण होता नयनतारा वाघीण. तिची चाल, आत्मविश्वास आणि राजेशाही थाट पाहून क्षणभर श्वास रोखला गेला. आपल्या नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे फिरणारी नयनतारा पाहणं हा खरोखरच अविस्मरणीय अनुभव होता. 

या सुंदर हवामानात आम्ही एकूण तीन सफारी केल्या आणि प्रत्येक सफारी वेगळी, खास आणि लक्षात राहणारी होती. ताडोबाची लोकप्रियता केवळ वाघांच्या दर्शनासाठी नाही, तर त्याच्या उत्तम व्यवस्थापनासाठीही आहे. सफारी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं घेतल्या जातात. प्रशिक्षित मार्गदर्शक आणि अनुभवी चालक जंगलातील नियम काटेकोरपणे पाळतातमार्गदर्शक फक्त वाघांबद्दलच नाही, तर झाडं, पक्षी, कीटक, प्राणी वर्तन, जंगल परिसंस्था आणि संवर्धन याबद्दलही सतत माहिती देतात. त्यामुळे प्रत्येक सफारी ही केवळ रोमांचक नसून शिकवण देणारीही ठरते.

एका सफारीत झायलो वाघ आपल्या दमदार उपस्थितीसह समोर आला. त्याची मजबूत बांधणी आणि टोकदार नजर पाहून थरार जाणवला. तर जुनाबाई वाघीण पाहणं हा वेगळाच अनुभव होता. तिचा अनुभव, तिचं क्षेत्रावरचं वर्चस्व प्रत्येक पावलातून जाणवत होतं. ती खरंच जंगलातील मातृत्व आणि ताकदीचं प्रतीक आहे. जुनाबाईची कन्या वीरा ही ताडोबातील आणखी एक दमदार व्यक्तिमत्त्व. आईचा वारसा तिनं समर्थपणे पुढे नेला आहे. तिची ठाम उपस्थिती आणि आत्मविश्वास तिला इतरांपेक्षा वेगळी ओळख देतो.

ताडोबामधील वाढती वाघांची संख्या, वारंवार होणारी दर्शनं आणि समृद्ध जैवविविधता हे यशस्वी संवर्धनाचं जिवंत उदाहरण आहे. सातत्यपूर्ण संरक्षण, शास्त्रीय व्यवस्थापन आणि स्थानिक समुदायाचा सहभाग यामुळे हे शक्य झालं आहे. २०२६ वर्ष पुढे सरकत असताना ताडोबात केलेली ही सुरुवात, जंगलाचं महत्त्व, संवर्धनाचं महत्त्व आणि निसर्गाकडे परत जाण्याची गरज याची ही आठवण सतत मनात राहील..  कधी कधी पुढे जाण्यासाठी निसर्गाकडे परतणं हीच खरी वाट असते.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प : जंगल सफारीचा सविस्तर मार्गदर्शक

१)          ताडोबाबद्दल थोडक्यात माहिती

जंगलाचे नाव: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (Tadoba Andhari Tiger Reserve)

राज्य: महाराष्ट्र जिल्हा: चंद्रपूर

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्वात जुना आणि प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प मानला जातो. दाट जंगल, समृद्ध जैवविविधता आणि वाघांची चांगली संख्या यामुळे ताडोबा निसर्गप्रेमी व वन्यजीव छायाचित्रकारांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.

२)          ताडोबा राष्ट्रीय उद्यानातील वनपरिक्षेत्रे (Forest Ranges)

ताडोबा राष्ट्रीय उद्यान तीन प्रमुख वनपरिक्षेत्रांमध्ये विभागलेले आहे. प्रत्येक परिक्षेत्राची भौगोलिक रचना व जैवविविधता वेगळी आहे.

1.       ताडोबा उत्तर परिक्षेत्र (Tadoba North Range)

- या भागात दाट सागवानाची (टीक) जंगले व प्राचीन जलसाठे आढळतात.

2.       मोहर्ली परिक्षेत्र (Moharli Range)

- ताडोबातील सर्वात सहज उपलब्ध व वाघांची संख्या जास्त असलेले परिक्षेत्र.

3.       कोलसा दक्षिण परिक्षेत्र (Kolsa South Range)

- खडबडीत भूप्रदेश, दुर्गम भाग आणि तुलनेने कमी मानवी हस्तक्षेप असलेले वन्य क्षेत्र.

३)          कोअर झोन प्रवेशद्वार (Core Zone Entry Gates)

कोअर झोन म्हणजे ताडोबाचे हृदय. येथे वन्यजीव दर्शनाची सर्वाधिक शक्यता असते. ताडोबामध्ये एकूण ६ प्रमुख कोअर प्रवेशद्वारे आहेत:

1.       मोहर्ली गेट

2.       खुटवंडा गेट

3.       कोलारा गेट

4.       नवगाव गेट

5.       पांगडी गेट

6.       झरी गेट

या प्रवेशद्वारांमधून संरक्षित अधिवासात नियंत्रित पद्धतीने प्रवेश दिला जातो.

४)          बफर झोन प्रवेशद्वार (Buffer Zone Entry Gates)

कोअर झोनच्या आजूबाजूला बफर झोन असून तो संवर्धन, मानव–वन्यजीव सहअस्तित्व आणि पर्यावरणीय पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ताडोबामध्ये एकूण १४ बफर प्रवेशद्वारे आहेत:

अगरझरी, देवाडा–आडेगाव, जुनोना, कोलारा, रामदेगी–नवेगाव, अलिझांझा, मदनापूर, मामला, पांगडी, सिरकाडा, झरी / पेठ, केसलघाट, चोरा–चिंचोला, निमडेला–रामदेगी.

५) ताडोबातील सफारी झोन (Safari Zones – Gate Wise)

सफारीचे व्यवस्थापन आणि पर्यटकांच्या सोयीसाठी ताडोबा चार प्रमुख सफारी झोनमध्ये विभागलेला आहे.

(C.1) मोहर्ली झोन

कोअर गेट्स: मोहर्ली, खुटवंडा

बफर गेट्स: देवाडा, आडेगाव, अगरझरी, जुनोना, मामला

हा झोन वारंवार वाघ दर्शनासाठी प्रसिद्ध असून सर्वाधिक लोकप्रिय मानला जातो.

(C.2) कोलारा झोन

कोअर गेट: कोलारा

बफर गेट्स: अलिझांझा, मदनापूर, सिरखेडा, कोलारा चौरादेव, पलासगाव, बेलारा

मोकळी जंगले, गवताळ प्रदेश आणि चांगली दृश्यता यासाठी कोलारा झोन ओळखला जातो.

(C.3) नवेगाव झोन

कोअर गेट: नवगाव

बफर गेट्स: नवगाव–रामदेगी, निमडेला

सुंदर निसर्गरम्य दृश्ये, पक्षीजीवन आणि शाकाहारी प्राण्यांची मोठी संख्या येथे पाहायला मिळते.

(C.4) पांगडी व झरी झोन

कोअर गेट्स: पांगडी, झरी

बफर गेट्स: पांगडी अस्वल चूहा, केसलघाट, झरी पेठ

तुलनेने कमी गर्दी असलेला हा झोन नैसर्गिक व रॉ जंगल अनुभव देतो.

६) जलस्रोत : ताडोबाची जीवनवाहिनी

ताडोबामध्ये सुमारे १८ जलस्रोत आहेत. त्यापैकी प्रमुख तलाव:

·       ताडोबा तलाव

·       जामणी तलाव

·       तेलिया तलाव

तेलिया तलाव हा अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि भरपूर वन्यजीवांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. हे जलस्रोत:

·       उन्हाळ्यात वनस्पती व प्राण्यांचे जीवन टिकवतात

·       स्थानिक मानवी वस्तीला आधार देतात

·       वाघांसाठी मुख्य क्षेत्र व विश्रांती स्थळ ठरतात

म्हणूनच अनेक प्रभुत्वशाली वाघांनी जलसंपन्न भागांना आपले मुख्य क्षेत्र बनवले आहे.

७) सफारी व्यवस्थापन व प्रवेश प्रणाली

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सर्व प्रवेशद्वारे:

·       अत्यंत सुव्यवस्थित

·       पूर्णपणे संगणकीकृत (ऑटोमेटेड)

·       प्रशिक्षित वनअधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली

यामुळे नियंत्रित पर्यटन, वन्यजीवांची सुरक्षितता, बुकिंगमधील पारदर्शकता आणि पर्यटकांना सुरळीत अनुभव मिळतो.

८)          सफारी वेळा व उत्तम हंगाम

·       सकाळची सफारी: सकाळी साधारण ६.०० वा. (३–४ तास)

·       दुपारची सफारी: दुपारी साधारण २.३० वा. (३–४ तास)

ताडोबा वर्षभर खुला असतो, मात्र:

·       ऑक्टोबर ते जून हा उत्तम काळ

·       मार्च ते मे मध्ये पाण्याची टंचाई असल्याने वन्यजीव दर्शनाची शक्यता जास्त

(हंगामानुसार वेळा बदलू शकतात, त्यामुळे अधिकृत वेबसाइटवर खात्री करणे आवश्यक आहे. शिवाय पावसाळ्यात कोअर झोन पर्यटनासाठी बंद असते)

👉 अधिकृत सफारी बुकिंग वेबसाइट: https://mytadoba.mahaforest.gov.in/

 

            धन्यवाघ ! 🐾🦉

            Stay Wild | Keep exploring 

No comments:

Post a Comment