Friday, 4 July 2025

DANDELI WILDLIFE | दांडेली वन्यजीव अभयारण्य

 


    दांडेली हे कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यात वसलेले एक समृद्ध जैवविविधतेने भरलेले जंगल आहे. हे क्षेत्र दांडेली-अंशी टायगर रिजर्वचा एक भाग आहे, ज्याला आता काली टायगर रिजर्व म्हणूनही ओळखले जाते. हे अभयारण्य काली नदीच्या किनाऱ्यावर वसले असून विविध प्रकारचे पशुपक्षी, सरपटणारे प्राणी आणि वनस्पतींनी समृद्ध आहे.

    आम्ही जानेवारी महिन्यात दांडेलीला भेट दिली. थंडीचा हंगाम असल्यामुळे हे जंगल भटकायला, जंगल सफारी करायला आणि पक्षी निरीक्षणासाठी एकदम योग्य होते. आमचे टार्गेट खूप सारे पक्षी बघणे आणि थंडीचा आस्वाद घेणे होते. आम्ही मुंबईहून ट्रेन ने प्रवास करून लोंढा येथे उतरलो, व येथून गाडीने आम्ही गुंड गावापर्यन्त गेलो, जिथे आमची राहायची सोय होती. रस्त्यात डोंगररांगा, हिरवीगार झाडी आणि अधूनमधून दिसणारे लहान गावं – या सगळ्यांमुळे प्रवास सुखद झाला.

 

थंडीमुळे सकाळी सकाळी आजूबाजूला धुके पसरलेलं असायचं. शांत गारवा आणि पक्ष्यांच्या मंजुळ आवाजांनी भरलेली सकाळअगदी स्वर्गीय वाटायचं. आम्ही गणेशगुडी परिसरात पक्षी निरीक्षण केलं, जे दांडेलीतील एक प्रसिद्ध हॉटस्पॉट आहे. इथे आम्हाला  बऱ्याच पक्षांचे दर्शन झालं. टिंबर ठिकाणी तर हॉर्नबिल्स (धनेश पक्षी) विपुल प्रमाणात दिसले. झाडांना फळे धरली होती त्यामुळे असंख्य धनेश त्यावर तुटून पडले होते. येथे इंडियन जायंट स्क्विरल सुद्धा यथेच्छ ताव मारताना दिसल्या.


दांडेलीचं जंगल म्हणजे भरपूर पर्जन्यवृष्टी मिळणारं सदाहरित जंगल. काली नदीचं पात्र हे इथल्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालणारं प्रमुख वैशिष्ट्य आहे. नदीवर कोळ्यांच्या होड्यांनी सफर, कयाकिंग, वॉटर राफ्टिंगसारखे साहसी उपक्रमही करता येतातजंगलामध्ये फिरताना वाघ, बिबटे, साळिंदर, रानडुक्कर, काळवीट असे प्राणी पाहायला मिळतात, पण यासाठी नशिब लागते. आम्ही जंगल सफारी केली पण मोठे प्राणी फारसे दिसले नाहीत; रानमांजर, साळिंदर पहाटेच्या वेळेला प्रवास करताना मात्र दिसले. जंगलाचा गूढपणा आणि शांतता अनुभवली व तो अनुभव जबरदस्त होता.

ह्या साऱ्या अनुभवांनी दांडेली आमच्या मनात कोरलं गेलं. नैसर्गिक सौंदर्य, पक्ष्यांचा कलरफुल जलवा आणि जंगलाची गूढ शांतताहे सगळं आम्ही पुन्हा अनुभवायचं ठरवलं आहे!

 

 

No comments:

Post a Comment